लाॅजच्या रूममध्ये होतेयं कागदपत्रांची तपासणी : अधिकारी वर्गाच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी
सिटी बेल | उरण | घनःश्याम कडू |
उरण तालुक्यातील काही ग्रामपंचायतीचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे. त्यातील काही भ्रष्टाचारी सदस्यांवर कारवाईचे आदेश येऊनही प्रशासनाकडून कारवाई होताना चालढकलपणा सुरू असल्याचे समजते. आता तर काही ग्रामपंचायतीचे ऑडीट तपासणीचा कार्यक्रम सुरू आहे. मात्र ऑडीट करणार्या अधिकारी वर्गांची चंगळ सुरू आहे. सदर तपासणी ग्रामपंचायतमध्ये करणे बंधनकारक असतानाही ते वास्तव्यास असलेल्या लाॅजवर ऑडीट तपासणीची कामे करीत असल्याची धक्कादायक माहिती काही ग्रामपंचायत कर्मचार्यांनी आमच्या प्रतिनिधीला दिली. तरी उरणमधील ग्रामपंचायतीच्या कारभाराची ऑडीट करणार्या अधिकारी वर्गाची वरिष्ठ अधिकार्यांनी सखोल चौकशी केली तर नक्कीच ग्रामपंचायतीचा व अधिकारी वर्गाचा भ्रष्ट कारभार उघड होईल अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे.
दरवर्षी ग्रामपंचायतीच्या कारभाराचे ऑडीट करण्यात येत असते. ऑडीटमुळे ग्रामपंचायतचा कारभार कसा आहे उघड होते. परंतु उरणमधील अनेक ग्रामपंचायतीचा कारभार आंधळा दळतोय आणि कुत्रे पीठ खातोय असा भ्रष्ट कारभार काही सदन ग्रामपंचायतीचा आहे. तो उघड होऊ नये म्हणून सत्ताधारी गटाकडून प्रयत्न असतो. ऐनकेन प्रकारे हा भ्रष्ट कारभार दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे.
ग्रामपंचायतीचे ऑडीट करण्यासाठी आपल्याच मर्जीतील अधिकारी वर्ग आणण्याचा प्रयत्न सत्ताधारी गटाकडून सुरू असतो. त्यामध्ये त्यांना यश येत असल्यामुळेच ग्रामपंचायतीचा भ्रष्ट कारभार उघड होत नाही. कारण ऑडीट करण्यासाठी येणार्या अधिकारी वर्गाना व्हीआयपी वागणूक मिळते. त्यामध्ये प्रामुख्याने त्यांची खातजमा करण्यासाठी चांगल्या प्रतीच्या लॉजमध्ये खाण्या-पिण्यासह रहाण्याची सोय केली जात आहे.
तसेच ऑडीटची तपासणी करीत असताना ती ग्रामपंचायत कार्यालयात करणे बंधनकारक असतानाही अधिकारी वर्ग बिनधास्तपणे वास्तव्यास असलेल्या हॉटेलवर तपासणी करून शेरा मारीत संबंधित ग्रामपंचायतींना आर्थिक हितसबंधातून क्लीन चिट दिली जात असल्याची चर्चा उरण तालुक्यात सुरू आहे. क्लीन चिट देण्यासाठी व केलेला भ्रष्टाचार दडपण्यासाठी लाखोंचा आर्थिक व्यवहार होत आहे. असा प्रकार दरवर्षी होत असल्याची धक्कादायक माहिती काही ग्रामपंचायत सदस्यांनी, ग्रामसेवक व काही कर्मचार्यांनी आमच्या प्रतिनधीला नाव न छापण्याच्या अटीवर दिली.
काही ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट कारभाराची अधिकारी वर्गांनी चौकशी केली असता अनेक गैरमुद्दे काढले असल्याचे समजते. ते या तपासणी लेखापरीक्षण अहवालात नमूद करण्यात येणार आहेत की नाही? याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे अशा ऑडीटरमुळे सत्ताधार्यांचे फावत आहे. या भ्रष्ट कारभारामुळे गेली अनेक वर्षे निवडून येत असलेल्या काही सदस्यांची मालमत्ता 15 कोटींच्या वर गेल्याचे समजते. तरी उरणमधील ग्रामपंचायतीचे ऑडीट करणार्या अधिकारी वर्गाचे वास्तव्याचे सीसीटीव्ही फुटेज बघितले तर नक्कीच त्यांचे आर्थिक हितसंबंध उघड होऊन ग्रामपंचायतीचा भ्रष्ट कारभाराला क्लीन चिट दिल्याचे उघड होईल. तरी ग्रामपंचायतीचे ऑडीट करणार्या अधिकारी वर्गाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते रमाकांत म्हात्रे यांनी केली आहे.








Be First to Comment