सिटी बेल | उरण | अजित पाटील |
जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) हे भारतातील एक प्रमुख कंटेनर पोर्ट आहे. तंत्रज्ञानाच्या बाबतीत प्रगति व बंदराच्या एकूण कार्यक्षमते मध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने जेएनपीटीने एनएसआयसीटी व एपीएमटी येथे 2 मोबाइल एक्स-रे स्कॅनर बसविले आहेत. या नवीन मोबाइल स्कॅनरचे उद्घाटन जेएनपीटीचे अध्यक्ष श्री संजय सेठी, भा.प्र.से. व मुख्य कस्टम आयुक्त श्री यू. निरंजन, जेएनसीएच यांनी बंदराचे भागधारक आणि व्यापार प्रतिनिधींच्या उपस्थितीत केले.

जेएनपीटीने बंदरातील जेएनपीसीटी, डीपीवर्ल्ड आणि एपीएमटी या तीन टर्मिनल्ससाठी प्रत्येकी एक असे तीन मोबाइल कंटेनर स्कॅनर्स आयपीए मार्गे खरेदी करून स्थापित केले आहेत, ह्या साठी एकूण 101 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या तीन स्कॅनर पैकी एक स्कॅनर 30.03.2021 रोजी कार्यान्वित झाला आहे. या व्यतिरिक्त, जेएनपीटीने बीएमसीटीपीएलसाठी एक ड्राइव्ह थ्रू कंटेनर स्कॅनर सुविधा सुरू केली आहे. ज्यासाठी एकूण 46.25 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. सध्या या प्रकल्पाचे 75% काम पूर्ण झाले असून ते मार्च 2022 पर्यंत कार्यान्वित होईल.
या नवीन मोबाइल कंटेनर स्कॅनरमुळे प्रति तास 20 कंटेनर स्कॅन केले जातील पर्यायाने बंदराच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होईल, ज्यायोगे आयात-निर्यात व्यापार वर्गाच्या मालाची जलद गतीने वाहतुक होण्यास मदत होईल. या नवीन मोबाइल स्कॅनरमुळे टर्मिनल आवारात असलेल्या कंटेनरची तपासणी करण्यास मदत होईल व यामुळे कंटेनर बंदरातून बाहेर पडण्या अगोदरच सुरक्षा यंत्रणांना योग्य ती कारवाई करता येईल. या सुविधेमुळे व्यापार वर्गाचा फायदा होणार आहे, कारण नवीन मोबाइल स्कॅनरद्वारे तपासणी झाल्यानंतर डीपीडी कंटेनर थेट बंदरातून बाहेर जाऊ शकतात. स्कॅनिंगची प्रक्रिया वेगवान असल्याने सर्व भागधारकांची वेळ व खर्चाची बचत होणार आहे.
या नवीन मोबाइल कंटेनर स्कॅनरच्या उद्घाटना विषयी बोलताना जेएनपीटी चे अध्यक्ष श्री संजय सेठी, भा.प्र.से. म्हणाले, “या नवीन मोबाइल एक्स-रे स्कॅनर सुविधेमुळे टर्मिनलच्या आवारातील कंटेनर स्कॅन करता येतील व संबंधित कंटेनर बंदरातून बाहेर पडण्याअगोदरच सुरक्षा दलांना योग्य ती कारवाई करता येईल. या स्कॅनरमुळे आमच्या कार्यक्षमते मध्ये वाढ होण्यास व प्रत्येक टर्मिनलसाठी स्वतंत्र स्कॅनिंग सुविधा निर्माण केल्यामुळे आयातीचा ड्वेल टाइम कमी करण्यास मदत होईल.
अशा प्रकारच्या उपाययोजनां केल्याने जेएनपीटीस तांत्रिकदृष्ट्या प्रगत जागतिक बंदरासमान बनविण्यास मदत होईल ज्यामुळे जगातील आघाडीच्या कंटेनर बंदरांमध्ये जेएनपीटीचे स्थान ऊंचावण्यास नक्कीच मदत होईल.
जेएनपीटीविषयी :
जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) हा नवी मुंबई येथील भारतातील सर्वात मोठे कंटेनर हाताळणीचे बंदर आहे. 26 मे 1989 मध्ये या बंदराची स्थापना झाली असून कामकाजाच्या तीनपेक्षा कमी दशकांत जेएनपीटी हे देशातील बल्क-कार्गो टर्मिनलवरून प्रीमियर कंटेनर पोर्ट म्हणून नावारूपाला आले.
सध्या जेएनपीटी येथे पाच कंटेनर टर्मिनल्स कार्यरत आहेत. ज्यामध्ये जवाहरलाल नेहरू पोर्ट कंटेनर टर्मिनल (जेएनपीसीटी), न्हावा शेवा इंटरनॅशनल कंटेनर टर्मिनल (एनएसआयसीटी), गेटवे टर्मिनल्स इंडिया प्रा. लि. (जीटीआयपीएल), न्हावा शेवा इंटरनॅशनल गेटवे टर्मिनल (एनएसआयजीटी) आणि नव्याने स्थापन करण्यात आलेल्या भारत मुंबई कंटेनर टर्मिनल्स प्रायव्हेट लिमिटेड (बीएमसीटीपीएल)चा समावेश आहे. या बंदरात सर्वसाधारण कार्गोकरिता शॅलो वॉटर बर्थ आणि आणखी एक लिक्विड कार्गो टर्मिनल आहे, ज्याचे व्यवस्थापन बीपीसीएल-आयओसीएल कन्सोर्टीयमद्वारे चालते.








Be First to Comment