प्रिन्स आणि टॉमी
सकाळ झाली. गावच्या डोंगरामागे सूर्य उगवला. एकेकाळी गावात ही वेळ गडबडीची असायची. मुलांची शाळेत जायची, घरातल्यांची शेतावर नाहीतर कामावर जायची, गडीमाणसे, बाया यांच्या कामाच्या लगबगीची अशी मोठी धांदलीची वेळ!
पण हा कोरोना आला आणि सगळच उलटंपालटं झालं. गावाचे रस्ते ओस पडले. कोणी घराबाहेर पडेना. गडीमाणसे पण येईना झाली.
मुले, मोठी माणसे घरातच अडकून राहिली. शेतात काम करणारे शेतावरच जाऊन राहिले.
गावच्या राजकारणात आणि गावगप्पा करण्यात रस असणाऱ्यांची तर मोठी पंचाईत झाली.
जाहीर कार्यक्रम, खेळांचे जंगी सामने, जत्रा इतकेच काय थिएटर सुद्धा बंद! तरुणांची रग जिरायची कशी? बऱ्याच दिवसात गावात भांडण, दोन गटांच्या मारामाऱ्या काही म्हणजे काहीच सनसनाटी झाले नव्हते.
दिवाळी नंतर जरा माणसे बाहेर पडू लागली. जरा हालचाल सुरू झाली पण गावात आता पूर्वीसारखी मजा नव्हती.
आजच्या दिवशी मात्र हे चित्र एकदम पालटले. झालं काय गावच्या पाटलाचा एकुलता एक नातू प्रिन्स खेळायला मित्र नाहीत आणि मोठ्या दोन्ही बहिणींची सकाळची अॉनलाईन शाळा असल्याकारणाने परसावात एकटाच बॉलने खेळत होता. आपणच बॉल फेकायचा आणि आपणच तो धावत जाऊन आणायचा असा तो स्वतःचा जीव रमवत होता.
पाटलांच्या घराच्या बरोबर समोर देसायांचे घर होते. मध्ये फक्त एक रस्ता. पण दोन्ही घरातून विस्तव जात नव्हता. पाटलांच्या आजोबांच्या भावाने देसांयांकडच्या कोण्या मुलीला मागणी घातली होती आणि त्या मुलीचे लग्न आधीच ठरले होते म्हणून देसायांनी पाटलांना नकार दिला होता. झाले!! तेव्हापासून पाटलांनी देसायांशी बोलणं टाकलच.
तेव्हाची तेढ पुढच्या पिढ्यांनी खतपाणी घालून चांगलीच वाढवली. आता पाटील पूर्वेला तर देसाई पश्चिमेला! ही अगदी काळ्या दगडावरची रेघ झाली होती.
गावकरी पण देसाई आणि पाटील यांना एकमेकांविरुद्ध भडकवायचे आणि आपण मजा बघायचे.
तर पाटलांचा प्रिन्स आपल्या घराच्या अंगणात बॉलने खेळत होता. त्याच्यावर लक्ष ठेवायला म्हणून मोठ्या वहिनीसाहेबांनी घरात कामाला असणाऱ्या पाटलांच्याच एका माणसाला, दिलीपला त्याच्यामागे पाठवले होते.
दिलीप तसा धाकट्या पाटलांच्या मर्जीतला. शहराच्या ठिकाणी फिरायला, कुठे कार्यक्रमात सोबत म्हणून पाटलांच्या अवतीभवती गावातली चार पोरं बॉडीगार्ड कम कार्यकर्ते कम सवंगडी म्हणून असायची . दिलीप त्यातलाच एक होता.आता तर तो पाटलांकडे म्यॅनेजर म्हणून रीतसर कामावर होता. म्हणायला मॅनेजर पण तसा हरकाम्याच.
तर हा दिलीप एकीकडे प्रिन्स वर लक्ष ठेऊन होता आणि तेव्हाच त्याच्या खास मैत्रिणीशी फोनवर प्रेमाच्या गुलूगुलू गप्पाही मारत होता. इथे पाटलांकडे प्रिन्स खेळत होता आणि देसायांचा भलामोठा कुत्रा टॉमीदेखील देसायांच्या घराच्या मागच्या अंगणात ऊन खात बसला होता.
झालं काय की खेळता खेळता प्रिन्सचा चेंडू उंच उडाला आणि देसायांच्या घराच्या मागच्या आवारात पडला, तो ही अगदी टॉमीच्या समोर. प्रिन्स आपला बॉल आणायला म्हणून रस्ता ओलांडून देसायांच्या अंगणात गेला तेव्हा टॉमी कुतुहलाने तो बॉल हुंगत होता आणि त्या बॉलवर पंजा मारत होता.
प्रिन्स बॉल आणायला म्हणून टॉमीजवळ गेला तेव्हा टॉमी गुरगुरत भुंकला. प्रिन्सला टॉमी आवडला आणि तो त्याच्या आणखी जवळ गेला. टॉमी अधूनमधून भुंकत त्याच्या बॉलवर पुन्हा पंजा मारू लागला.बॉल हातात घेऊन धावणाऱ्या प्रिन्सच्या मागेमागे जाऊ लागला. इतकावेळ फोनवर बोलणाऱ्या दिलीपचे लक्ष टॉमीच्या भुंकण्याने विचलित झाले आणि त्याने ज्यावेळी समोर बघितले तेव्हा टॉमीच्या तोंडाजवळ प्रिन्सचा हात होता आणि प्रिन्स ओरडत होता. याला वाटले की टॉमी प्रिन्सला चावला.
“देसायांचं कुत्र प्रिन्सबाळाला चावलं!” असे ओरडतच तो घरात शिरला. मोठे पाटील म्हणजे प्रिन्सचे आजोबा आणि धाकटे पाटील म्हणजे प्रिन्सचे बाबा दोघेही घरातच होते. त्यांना भेटायला गावातली चार माणसं आली होती. चार गडी पण घरातच होते. दिलीपच्या आवाजाने सगळेच आपापली कामे सोडून त्याच्याभोवती गोळा झाले. दिलीपचे बोलणे ऐकून पाटलांकडची सगळी पुरूषमाणसे जाब विचारायला देसायांच्या पुढच्या दरवाजाशी गेले. देसायांकडेही माणसांचा राबता होताच. पाटलांबरोबर पाचसहा माणसे आलेली बघताच देसायांची माणसे देखील समोर येऊन उभी राहिली.
“ओ देसाई, तुम्हाला त्या कुत्र्याला सांभाळता येत नाही काय?मोकाट सोडताय सगळीकडं. पिसाळलय जणू तुमचं कुत्र!”
देसायांच्या घरात टॉमी म्हणजे घरातल्या माणसासारखा होता. त्यांच्या घराची शान होता. त्याला कोणी हाऽड केलेले पण देसायांना चालायचे नाही.
“ओ पाटील, झालं काय? एवढ्या सकाळी सकाळी कसली बोंबाबोंब सुरू आहे. आमच्या टॉमीने काय केलेय? उगाच मुक्या प्राण्याला कशाला बोल लावताय.”
“काय केलेय? तुमचं भिकारडं कुत्रं खाऊन माजलय ते. माझ्या प्रिन्सला चावलय. त्याला काही झालं ना तर तुमच्या त्या कुत्र्याला गोळीच घालंन.” धाकटे पाटील गुरगुरले.
” आमच्या टॉमीला भिकारडं म्हणायचं काम नाय. तुमच्या पोरानच कायतरी खोड काढली आसल तो उगा कोणाच्या वाटेला जायचा न्हाई “देसाई तरी कशाला गप्प बसतायत.
” तुमच्या त्या टॉम्याला का फॉम्याला बांधून ठेवा घरात. आमच्या पोराच्या वाटेला जायचं न्हाई.”दिलीपला पण खुमखुमी आली.
“नाही ठेवणार बांधून काय करशिला ते कर. आम्ही काय घाबरतो की काय तुम्हाला. “देसायांकडचा कोणीतरी म्हणाला.
” काय करशील?दावतोच तुला” असे म्हणत दिलीपने त्याच्या सणऽकन कानफटात वाजवली. (दिलीपची मैत्रिण याला पण आवडायची. त्यामुळे दिलीप याच्यावर खार खाऊन होताच. त्याला आता आयते कारण मिळाले.)
आता मात्र देसायांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. पाटलांच्या सात पिढ्यांचा ग्राम्य भाषेत उद्धार करत त्यांनी दिलीपची बखोट धरली. पाटलांच्या अस्मितेचा प्रश्न निर्माण झाला आणि पाटलांनी पण आपले भाषा कौशल्य दाखवले पाटलांची माणसे देसायांच्या माणसांना भिडली आणि एकच धुमाकूळ सुरु झाला. दहाबारा जणांची मारामारी सुरू झाली. अलगदपणे मोठे, धाकले पाटील आणि देसाई बाजूला झाले. फक्त आरडाओरडा करून इतरांना चिथावणी देऊ लागले. गावात आजूबाजूला रहाणारी माणसे पण तिथे गोळा झाली. थोड्याचवेळात पाटलांच्या प्रिन्सला देसायांच्या टॉमी चावला ही बातमी कानगोष्टी प्रमाणे गावभर पसरली पण गावच्या चावडीवर पोहोचेपर्यंत प्रिन्सच्या हाताचा टॉमीने लचका तोडला असे त्या बातमीचे स्वरूप झाले होते!!
गावची शांतता पुरेशी भंग पावल्यावर पोलीसांची गाडी सायरन वाजवत आली. सायरनचा आवाज ऐकल्यावर अचानक मारामारी बंद झाली. कोणाचीच काही तक्रार नसल्या कारणाने पोलीस हात हलवत परत गेले.
गावातल्या हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांची पेशंटना टाके घालून आणि बॅंडेज बांधून पुरेवाट झाली.
मोठ्या पाटलीणबाईंनी शहाणपणा दाखवून दिलीप ओरडत घरी आला तेव्हाच एका मोलकरणीकरवी प्रिन्सला घरी आणले. . डॉक्टर येऊन प्रिन्सला तपासून गेले. प्रिन्सला काहीही झाले नव्हते. तो पुन्हा खेळायला गेला सुद्धा. जेव्हा डॉक्टर दिलीपला टिटॅनसचे इंजेक्शन देत होते तेव्हा प्रिन्स आपल्या अंगणात आणि टॉमी त्याच्या अंगणात एकमेकांपासून दूर खेळत होते.
डॉ. समिधा गांधी, पनवेल
Be First to Comment