सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |
लसीकरण आणि येऊ घातलेल्या तिसऱ्या लाटे पासून सुरक्षित राहण्यासाठी संयुक्त उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशन, तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, समर्पित कोविड हेल्थ सेंटर, कोविड केअर सेंटर यांचे संयुक्त विद्यमाने जनजागृती मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेस चांगला प्रतिसाद मिळत आहे.
आज उरण तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये तहसीलदार भाऊसाहेब अंधारे आणि महसूल विभाग, गट विकास अधिकारी निलम गाडे आणि पंचायत समिती विभाग, उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. विकास मोरे, सेक्रेटरी डॉ. सत्या ठाकरे आणि डॉ. सुरेश पाटील, तसेच समर्पित कोविड हेल्थ सेंटरचे प्रमुख डॉ मनोज भद्रे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र इटकरे तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना लसीकरण आणि कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटे पासून सुरक्षित राहण्यासाठी कोणकोणती खबरदारी घेतली पाहिजे या संदर्भात जनजागृती मोहीम यशस्वी रित्या पार पाडली. त्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये सरपंच, उपसरपंच, तलाठी, ग्रामसेवक, सदस्य आणि नागरिक यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार यांनी चिरनेर आणि कळंबुसरे येथे तर प्रा राजेंद्र मढवी सर यांनी खोपटा येथे मार्गदर्शन केले. डॉ. सुरेश पाटील, डॉ. विकास मोरे, डॉ. सत्या ठाकरे, डॉ. सुरज मढवी, डॉ. अविनाश तांडेल, डॉ. अजय कोळी, डॉ. हरी ओम म्हात्रे, डॉ. अजय लहासे यांनी केगाव, नागाव, म्हातावली, फुंडे, चाणजे, भेंडखल, जसखार, करंजा या ग्रामपंचायतमध्ये जावून जनजागृती केली. तसेच लोकांना तिसऱ्या लाटे पासून कसे सुरक्षित राहावे याचे मार्गदर्शन केले. काही ग्राम पंचायतमध्ये पुढील आठवड्यातील मासिक ग्राम सभेच्या आधी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
सदर अभियानास भरघोस प्रतिसाद मिळाल्याने उरण तालुक्यात कोरोना विषाणूची तिसरी लाट आली तरी त्यावर मात करण्याची मानसिकता जनतेची झालेली असल्याचे बोलले जाते.








Be First to Comment