*शब्द संगीत क्रमांक ६
वटपौर्णिमा
- पुराण काळातील कथा सत्यअसतात की असत्य यापेक्षा त्या प्रत्येक कथांमधून काहीतरी मेसेज किंवा काहीतरी संदेश हा आपण डोळसपणे पाहिलं तर नक्कीच असतो.
त्या प्रत्येक कथांमागे विज्ञान आहे .
या कथांमध्ये निसर्ग , आपली जीवनशैली , आयुर्वेद याची सखोल अभ्यासा सोबत सांगड घातलेली दिसून येते .
त्या फक्त परंपरा किंवा खुळचट कल्पना नक्कीच नाहीयेत..!
पण त्या परंपरा किंवा कल्पना मध्ये आपण किती गुंतायचं..?
किती वहावत जायचं…? आणि त्या नावाने किती कर्मकांड करायचं..?
हा खूप मोठा जटील प्रश्न आहे .
प्रत्येक वर्षी या पूजा , सण , उत्सव आपण करायचे म्हणून करतो.
परंतु वडाला फेऱ्या मारायच्या म्हणजे फक्त परंपरा घेऊन पुढे जायचं की त्या परंपरांचा जो आपल्या पूर्वजांनी , ऋषी – मुनींनी एक विचार करून त्या योजल्या आहेत त्यामध्ये बदल करून निसर्गाला पूरक असं वागायचं याचाही विचार आपण करायला हवा
कारण निसर्ग काहीही न मागता आपल्याला भरभरून देतच असतो.
सर्वात जास्त अॉक्सिजन देणारं वडाचं झाड
जीवदान देणारं झाड म्हणून वडाची पूजा करायची . भरभरून अॉक्सिजन देतं म्हणून त्याच्या सान्निध्यात काही वेळ घालवायचा . त्याची आणि एकूणच या निमित्तानं निसर्गाची पूजा करायची हा हेतूच किती उदात्त आहे…!
आपण दरवर्षी पर्यावरण दिन देखील साजरा करतो.
गावोगावी आजही मोठमोठी वडाची झाडे आणि त्याभोवती बांधलेले पार ( बसण्यासाठी कट्टा )
आजही जुन्या खुणा घेऊन उभे आहेत .
आणि या पारावर सकाळ , संध्याकाळ आणि उन्हाळ्यात तर भर दुपारी सुद्धा गावातील मंडळींचा गप्पांचा फड रंगतो . कारण वडाचं झाड हे उन्हाळ्यात दोन टन बाष्प म्हणजे पाणी हवेत फेकतं म्हणून या झाडाखाली उन्हाळ्यात सुद्धा थंडगार वाटते.
झाडावर अनेक पक्षी आनंदानं राहतात. घरटी बांधतात . वडाची छोटी छोटी लाल लाल फळं खातात . पक्षांनी खाल्लेल्या याच बिया नवीन झाडांसाठी बीजरोपन करतात .
त्याच्या लांबच लांब पारंब्या बाराही महिने लहान मुलांसाठी आनंदाचा झोका असतो. मुलाबाळांना , पशु पक्षांना घेऊन जणू हे झाड अंगा खांद्यावर खेळवत असतं..!
वडाचे झाड एका तासाला ७१२ किलो अॉक्सिजन हवेत सोडते.
या वडाच्या बिया , वडाचा चीक , पारंब्या , साल औषधी म्हणून अतिशय उपयुक्त आहे .
असे अनेक वैज्ञानिक गुणधर्म या झाडांत आहेत
म्हणूनच वडाच्या झाडाला अक्षयवृक्ष असे म्हटले जाते…!
आज या पूजनासाठी जर आपण फांद्या तोडत असू तर केवढा निसर्गाचा ऱ्हास करतोय आपण..?. हे आपल्या कधी लक्षात येणार …?
निसर्गाच्या प्रकोपाची केवढी किंमत मोजतोय आपण..!
यासाठी झाडे लावू. झाडे जगवू ही छोटीसी कृती त्या निसर्ग देवतेसाठी आपण नक्कीच करू शकतो…!
सध्या अॉक्सिजन विना शेकडो लोकांचे प्राण आपण वाचवू शकलो नाही आणि हे दुःख अजूनही पचवूही शकलो नाही . खरंतर अजून पुरते सावरलो देखील नाही . आणि तरी यातून आपण खरंच काहीच शिकणार नाही का..?
संगीता थोरात.
नवीन पनवेल .
Be First to Comment