पावसाळ्यात मासेमारीला बंदी असतानाही बोटींना बायो डिझेलच्या पुरवठा
सिटी बेल | उरण | घनःश्याम कडू |
पावसाळी बंदी असतानाही अधिकारी वर्गाच्या आशीर्वादाने उरणमध्ये मासेमारी करण्यासाठी बोटी समुद्रात गेल्या असल्याचे बोलले जात आहे. याबाबत मत्स्यव्यवसाय अधिकारी वर्गही थातुरमातुर कारवाई करीत आहेत. मासेमारी करण्यासाठी जाणार्या बोटींमध्ये मच्छीमार सोसायटीच्या प्रमुख पदाधिकार्यांचा समावेश असल्याची माहिती नाव न छापण्याच्या अटीवर एका स्थानिक नाखवांनी दिली आहे.
याबाबत अधिकारी वर्ग माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत. याबाबत लवकरच कोणाच्या बोटी मासेमारीसाठी जात आहे. याची माहिती प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच मासेमारीस जाणार्या बोटींसाठी बंदी असलेल्या बायो डिझेलचा पुरवठा टँकर द्वारे केला जात आहे.
1 जून ते 31 जुलै 2021 पर्यंत राज्यात यांत्रिक मासेमारी बोटींना पावसाळी मासेमारी बंदी घालण्यात आली आहे.या कालावधीत मासळीच्या जीवांना प्रजोत्पादनास पोषक वातावरण असते.या कालावधीत मासेमारी बंदीमुळे मासळीच्या बीज निर्मिती प्रक्रियेस वाव मिळुन मासळीच्या साठ्याचे जतन होते.
तसेच या कालावधीत खराब व वादळी हवामानामुळे होणारी मच्छिमारांची जीवित व वित्त हानी मासेमारी बंदीमुळे टाळता येणे शक्य होते. त्यामुळे कोकण किनार्यावरील शेकडो मच्छिमार बोटी आपापल्या बंदरात नांगर टाकून उभ्या करण्यात आल्याचे सांगतात. मात्र परिस्थिती वेगळीच आहे.
मासळीच्या साठ्याचे जतन तसेच मच्छिमारांचे जीवित व वित्त यांचे रक्षण या हेतूने या वर्षी 1 जून ते 31 जुलै 2021 या कालावधीत राज्यात सागरी क्षेत्रात सागरी किनार्या पासून 12 सागरी मैलापर्यंत यांत्रिक मासेमारी बोटींना पावसाळी मासेमारी बंदी करण्यात आली आहे. तरीही उरण परिसरातील सोसायटीच्या अधिकारी वर्गाच्याच बोटी मासेमारी करण्यासाठी जात असल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे.
मासेमारीस बंदी असतानाही उरण परिसरातील काही बोट मालक काही अधिकारी वर्गाशी संधान बांधून मासेमारी करण्यासाठी बोटी पाठवीत असतात. सदर बोटी मासेमारी करण्यासाठी जाऊन 2 ते 3 दिवसांत परत येत आहेत. तसेच मासळी घेऊन आल्यानंतर ज्या ठिकाणी उतरवली जाते त्या ठिकाणी जाणारा रस्ता वाहांनाना बंद केला जातो. जेणेकरून कोणी येऊ अथवा याची माहिती बाहेर समजू नये यासाठी हा सारा खटाटोप सुरू असतो अशी माहिती तेथील एका नाखवांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली.
काहीजण बंदीमुळे मासेमारी करण्यास बोटी जात नसल्याचे सांगतात. तसेच नारायणाच्या कृपेने बंदी असलेल्या बायो डिझेल मासेमारीसाठी जाणार्या बोटींना पुरवठा केला जात आहे. त्याचा पर्दाफाश लवकरच केला जाणार आहे.
बंदी काळात मासेमारी करणार्या 14 बोटींवर कारवाई करणात आली असल्याचे अधिकार्यांनी सांगितले आहे. बंदी असतानाही मासेमारी करणार्या बोटींची व त्यांच्या मालकांची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास व परवाना अधिकारी यांनी करावी. अन्यथा याबाबत वरिष्ठांकडे दाद मागण्यांच्या तयारीत उरणमधील सामाजिक संघटना असल्याचे समजते.








Be First to Comment