नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि बा पाटील यांचेच नाव दिले पाहिजे : युवा नेते मयुरशेठ भोईर यांची ठाम भूमिका
सिटी बेल | पनवेल | वार्ताहर |
नवी मुंबई विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दि बा पाटील यांचेच नाव देण्याचा चंग बांधलेल्या स्थानिक भूमिपुत्र व प्रकल्पग्रस्त बांधवांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सर्वपक्षीय बैठकांच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांचा रोष जागोजागी उमटत आहे. नामांतर वादाच्या याच पार्श्वभूमीवर आमच्या प्रतिनिधीने पनवेल यंग, डॅशिंग,डायनामिक युवा नेते मयुरशेठ भोईर (कुंडेवहाळ-पनवेल) यांच्यासोबत चर्चा केली असता,नवी मुंबई विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दि बा पाटील साहेब यांचेच नाव दिली पाहिजे अशी आग्रही भूमिका मयुरशेठ भोईर यांनी मांडली.
मयुरशेठ भोईर म्हणाले की, वस्तुतः आमचा हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला विरोध नाही. परंतु त्यांचे नाव राज्यातील अन्य कुठल्याही वास्तूला देता येऊ शकेल. या आधीच समृध्दी महामार्गाला बाळासाहेबांचे नाव दिले आहे, मुंबईत ४०० कोटी रुपये खर्च करून बाळासाहेबांचे भव्य स्मारक उभे राहत आहे. पण प्रकल्पग्रस्तांचे कैवारी म्हणून ओळखले जाणारे दि बा पाटील साहेब यांचे असे कोणतेही स्मारक नाही. त्यांचे येथील कर्तुत्व ध्यानात घेतलेच पाहिजे. रायगड ही त्यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी देखील आहे.राजकारण आणि समाजकारण करत असता त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला आहे. महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते,दोन वेळा खासदार, पाच वेळा आमदार असणाऱ्या दि बा पाटील यांना स्थानिक भूमिपुत्र व प्रकल्पग्रस्त बांधव अत्यंत मानतो. आज याठिकाणी साडेबारा टक्के विकसित परतावा भूखंड प्रकल्पग्रस्तांना मिळाले ते केवळ दि बा पाटील यांच्याच मुळे. त्यांच्या मुळेच आता हा कायदा संपूर्ण देशात लागू झाला आहे. आज येथील भूमिपुत्र ऐश्वर्य संपन्न जीवन जगत असेल तर ते केवळ दि बा पाटील साहेब यांच्या मुळेच.येथे सिडको च्या माध्यमातून कॉलनी विकसित झाल्या असतील पण त्यासाठी आमच्या जमिनी संपादित केल्या आहेत.दोन दशके पाठीमागे जाऊन पाहिल्यास आमच्या जमिनींचा योग्य मोबदला आम्हाला मिळालाय तो फक्त दी बा पाटील साहेबां मुळेच.
मयुरशेठ भोईर पुढे म्हणाले की, आज येथील विभाग हा आगरी कराडी कोळी व अन्य बहुजन समाज बहुल आहे. आमची पार्श्वभूमी लक्षात घेतली असता येथील बहुजन समाजाची एक वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती आहे. आमच्या संस्कृतीची ओळख जपून ठेवण्यासाठी देखील दि बा पाटील यांचे नाव विमानतळाला देणे संयुक्तिक होईल. त्यामुळे राज्य सरकारने येथील जनतेच्या भावनांचा आदर करत नवी मुंबई विमानतळाला माजी खासदार स्वर्गीय लोकनेते दि बा पाटील यांचेच नाव देण्याचा विचार करावा.
दि बां साठी थोड्या दिवसांपूर्वी आम्ही भूमीपुत्रांनी भव्य मानवी साखळी उभारली होती.आणी येत्या २४ तारखेला आम्ही संपूर्ण ताकदीनिशी सिडको ला घेराव घालून भूमीपुत्रांची ताकद राज्य शासनाला नक्कीच दाखवून देऊ याचा मला विश्वास वाटतो.
Be First to Comment