नवी मुंबई विमानतळाला नाव दि बा पाटील साहेबांचेच ! – गजानन पाटील यांची रोखठोक भूमिका
सिडको अस्थापना च्या वतीने उभारण्यात येत असणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव कुणाचे द्यावे हा वाद सध्या सर्वत्र गाजतो आहे. राज्य सरकारच्या वतीने सिडको वर दबाव आणून आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव पारित करण्यात आला आहे. घाईघाईने घेतलेल्या या निर्णयावर प्रकल्पग्रस्त बांधव आणि भूमिपुत्र प्रचंड नाराज आहेत. गरज नसताना ओढावून घेतलेल्या या वादामुळे राज्य सरकार चांगलेच अडचणीत येणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आमच्या प्रतिनिधीने दापोली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा पुष्पक कमिटीचे सल्लागार गजानन पाटील यांच्या बरोबर चर्चा केली असता,नवी मुंबई विमानतळाला नाव दि बा पाटील साहेबांचेच! अशी रोखठोक भूमिका त्यांनी मांडली.
गजानन पाटील म्हणाले की, सत्तरच्या दशकामध्ये सिडकोने आमच्या जमिनी संपादित केल्या. आमच्या अधिग्रहित केलेल्या जमिनीचा योग्य मोबदला मिळवण्यासाठी लोकनेते दि बा पाटील पहिल्या दिवसापासून आंदोलन करत होते. त्यांच्या अभ्यासू आणि आक्रमक शैलीच्या आंदोलनामुळे आज इथल्या प्रकल्पग्रस्त बांधवाला परिपूर्ण मोबदला मिळाला आहे. ही सगळी आंदोलने त्यांनी केवळ आणि केवळ प्रकल्पग्रस्त बांधवाला फायदा मिळावा या उद्देशाने केली होती. पाच वेळा आमदार, दोन वेळा खासदार, एक वेळा राज्याचे विरोधीपक्षनेते,एक वेळ थेट जनतेतून नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर देखील त्यांनी स्वतःसाठी काहीही न कमावता जे काही केले ते सारे प्रकल्पग्रस्त बांधवांच्या उत्कर्षा करिता केले. प्रकल्पग्रस्त बांधवांसाठी आंदोलने करत असताना ते जायबंदी झाले, कारावास देखील भोगला.त्यामुळे अशा निस्वार्थी लोकनेते दि बा पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला दिलेच पाहिजे.
प्रकल्पग्रस्त बांधव उभारत असलेल्या आंदोलनाबाबत छेडले असता गजानन पाटील म्हणाले की काल आम्ही जे मानवी साखळी आंदोलन केले ते सरकारला गर्भित इशारा देण्यासाठी आंदोलन केले होते. हे आंदोलन आम्ही अत्यंत शांत राहून व शिस्तीने पार पाडले. कोरोना विषाणूची दुसरी लाट अद्याप ओसरली नाही याचे आम्हाला परिपूर्ण भान आहे. त्यामुळेच प्रत्येक घरातून एक व्यक्ती आंदोलनात सहभागी व्हावी एवढीच अपेक्षा आम्ही केली होती. आमच्या अठरा गावातील क्रीडा प्रकारांच्यात निष्णात अशा खेळाडूंनी विमानतळाला दि बा पाटील यांचेच नाव द्यायचे या ध्येयाने मानवी साखळीच्या माध्यमातून दिबांच्या नावाची भव्य दिव्य मानवी साखळी उभारली. आंदोलनातील आमची शिस्त, आमचे नियोजन आणि सहभागी झालेल्या प्रकल्पग्रस्त बांधवांचा संयम बघून पोलीस बांधवांनी देखील आमचे कौतुक केले. असे जरी असले तरी हे सरकार जर आमच्या भावनांची दखल घेणार नसेल तर मात्र आम्हाला पराकोटीचा संघर्ष उभारावा लागेल.
Be First to Comment