वाढत्या वजनाने जेष्ठ नागरिकांमध्ये वाढल्या आरोग्याच्या तक्रारी
सिटी बेल | आरोग्य कट्टा |
सर्वजण घरामध्ये अडकून पडलो आहोत व याचे अनेक दुष्परिणाम आपल्या शरीरावर झाले असून याचा सर्वात जास्त फटका जेष्ठ नागरिकांना बसला आहे. आयुष्यभर काबाडकष्ट केल्यानंतर सरतं आयुष्य सुसह्य, शांत आणि समाधानी करायचं अशी प्रत्येकाची इच्छा असते परंतु लॉकडाउन काळामध्ये जेष्ठ नागरिकांना सर्वात जास्त मानसिक व शारीरिक त्रास झाला आहे असे अनेक निरिक्षणातून आपल्याला दिसून आले आहे.
नवी मुंबईतील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरतर्फे केल्या गेलेल्या एका सर्वेक्षणानुसार नवी मुंबईतील ३० ते ४० टक्के जेष्ठ नागरिकांचे वजन वाढले असून यामध्ये महिलांची संख्या मोठी आहे. याविषयी अधिक माहिती देताना तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटरचे अस्थी व्यंग तज्ञ व शल्यविशारद डॉ समीर चौधरी म्हणाले, ” एक जून पासून तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे कोरोना नियमांचे पालन करून जेष्ठ नागरिकांसाठी आरोग्यविषयक उपक्रम आम्ही राबविण्यास सुरुवात केली असून सांधेदुखी व गुडघेदुखीचे अनेक रुग्ण वाढत असल्याचे आम्हाला आढळून आले व या सर्वांमध्ये एकच कॉमन समस्या होती ती म्हणजे गेल्या दीड वर्षांपासून वाढलेले वजन. तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलने ३०० जेष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण केले असून यातील दीडशेहून अधिक नागरिकांचे सरासरीपेक्षा १० ते १५ किलो वजन वाढले आहे. वयाच्या साठीला आलेले ८० टक्के जेष्ठ नागरिक हे आधीच हे सांधेदुखीने त्रस्त असतात तसेच यापैकी ५० टक्के ज्येष्ठ नागरिकांकडे सांधे प्रत्यारोपण तसंच वेगवेगळ्या शल्यचिकित्सा करण्यासाठी पुरेसा निधीसुद्धा उपलब्ध नसतो.
आर्थिक सुबकता, वैज्ञानिक संशोधन, आधुनिक उपचार पद्धती यामुळे नागरिकांची वयोमर्यादा वाढली आहे. त्यामुळे पर्यायाने ज्येष्ठ नागरिकांची संख्या देखील वाढली आहे. मात्र, ज्येष्ठ नागरिकांच्या वाढत्या संख्येसोबतच त्यांच्या अनेक आरोग्य समस्याही पुढे आल्या आहेत. कोरोनाची दुसरी लाट अजूनही संपलेली नाही व तिसऱ्या लाटेचे संकेत वैद्यकीय क्षेत्रातून मिळत आहेत अशामध्ये जेष्ठ नागरिकांना भविष्यात अजून जास्त समस्या होणार आहेत.”
बेलापूर येथे राहणारे जेष्ठ नागरिक श्री नीलकंठ जांभेकर ( वय ७४) सांगतात , माझे वाढलेले वजन आणि लठ्ठपणाची स्थिती हा कोविड-१९ चा परिणाम आहे, ज्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. आमची प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे जेष्ठ नागरिकांना घरात अडकून राहावे लागत आहे. घरात अडकून राहिल्यामुळे मला माझ्या मित्राना भेटता येत नाही. कोरोना नसताना आम्ही रोज ३ ते ४ किलोमीटर अंतर पायी चालत होतो आता लॉकडाउन झाल्यामुळे माझा व्यायाम हा पूर्णपणे बंद झाला आहे , वाढत्या वजनामुळे मला आता कोरोना संसर्गाची भीती वाटू लागली आहे. डॉ. समीर चौधरी जेष्ठ नागरिकांना सल्ला देताना सांगतात झटकन वजन कमी करणे शक्य होत नसले तरी आहे त्या वजनावर ताबा ठेवणे आपल्या हातात आहे त्यामुळे घरात असताना शारीरिक हा;हालचालीकरिता आळस करू नका.
घरातल्या घरात सतत कार्यक्षम राहण्याचा प्रयत्न करा. घरच्या घरी या सोप्या नियमांचे पालन करून मानसिक आणि शारीरिक आरोग्य जपण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे, या सोबतच बिस्किट, नूडल्स, आईस्क्रीम, केक्स आणि गोड पेय पदार्थ याचा जास्त वापर टाळला पाहिजे. कोविड १९ सारख्या संक्रमणाला आळा घालण्यासाठी सध्या तरी घरी राहण्यापासून आपल्याकडे दुसरा पर्याय नाही.








Be First to Comment