सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |
पनवेलमधील उलवा नोडमध्ये अन्न व औषध प्रशासनाच्या दक्षता विभागाने धाड टाकत १९ लाखांचा गुटखा जप्त केल्याची घटना घडली. मग उरणमधील गुटखा विक्रेत्यांना कोणाच्या वरदहस्ताने खुलेआम गुटखा विक्रीचा परवाना मिळाला अशी चर्चा नाक्यांनाक्यावर सुरू आहे.
उलवा सेकटर १० मधील दोन घरात मोठ्या प्रमाणात गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ लपविल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या दक्षता विभागाला मिळाली. त्यावेळी संबंधित अधिकारी वर्गांनी छापा मारला असता त्यामध्ये १९ लाखाचा पान मसाला व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा आढळून आला. सदरचा माल जप्त करून २ जनांविरोधात न्हावाशेवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उलवा नोडपासून जवळपास असणाऱ्या उरण परिसरात गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम विक्री सुरू आहे. ही विक्री छुप्या पद्धतीने पटेल, सोनू, शहा व इतर टपरीधारक करीत आहेत. याबाबत अनेकांनी तक्रारी करूनही त्यावर कारवाई होण्याऐवजी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
आज उरण परिसरात ऍक्टिवाच्या डिकीत गुटखा भरून त्याची विक्री केली जाते. या गुटख्याबरोबर इतर नशिली पदार्थांची सर्रासपणे विक्री होत आहे. तसेच शहराच्या बाहेरील मुख्य भररस्त्यावर हातात तंबाखूजन्य पदार्थांच्या पुड्या घेऊन विक्री करतानाचे चित्र पहावयास मिळते. या सर्व घटनांवरून अन्न व औषध प्रशासन खात्याचे आर्थिक हित संबंधातून त्यांना अभय दिला जात असल्याची चर्चा उरण परिसरात सुरू आहे.







Be First to Comment