Press "Enter" to skip to content

पावसाळी पर्यटनामुळे नागरिकांना होऊ शकते कोरोनाची लागण

बुरशीचा आजार टाळण्यासाठी पावसाळी पर्यटन टाळण्याचा डॉक्टरांचा सल्ला

सिटी बेल | आरोग्य प्रतिनिधी |

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या तीन महिन्यांपासून घरांत बंद असलेल्या नागरिकांना लॉकडाउन शिथिल झाल्यामुळे अनेकांना पावसाळी पर्यटनाचे वेध लागले आहेत मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावाचा धोका पाहता यावर्षी पावसाळी पर्यटन न करण्याची आवाहन केले जात आहे. पावसाळा हा सीजन लहानथोरांपासून ते वयाची सत्तरी पार केलेल्या आजी- आजोबांना पर्यटनाची भुरळ घालतो, परंतु अजूनही महाराष्ट्र दुसऱ्या लाटेतून सावरलेला नसून पावसाळी पर्यटन हे कोरोना पसरविण्याचे केंद्रस्थान बानू शकते अशी भीती वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

पावसामुळे हिरव्यागार झालेल्या डोंगरदऱ्या व त्यातून वाहणारे छोटे मोठे धबधबे हे आपल्या सर्वानाच दरवर्षी आकर्षित करीत असतात, परंतु यावेळी आपल्या हौसेला थोडी मुरड घालण्याची गरज आहे. याविषयी अधिक माहिती देताना कल्याण येथील स्टारसिटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक व फिजीशियन आणि इंटेंसिव्हिस्ट डॉ. प्रदीप शेलार सांगतात ” पावसाळी पर्यटन हे जून-जुलै-ऑगस्ट या तीनच महिन्यांत चालते परंतु नुकतीच कोरोनाची दुसरी लाट येऊन गेली आहे व ही लाट अजूनही संपलेली नाही. जर आपल्याला पुन्हा लॉकडाउन नको असेल तर यावर्षी पावसाळी पर्यटन थांबविले पाहिजे कारण पावसाळ्यामुळे हवामानात तसेच आरोग्यामध्ये बरेच बदल घडतात. पावसाळ्यामध्ये तापमानातील तीव्र चढउतार शरीराला वेगवेगळ्या संक्रमणास बळी पाडतात, म्हणूनच कोरोना किंवा कोविड-१९ या जागतिक साथीच्या रोगाचा प्रारंभ आणि वेगवान प्रसार हे ज्येष्ठ नागरिक, कमी प्रतिकारशक्ती आणि दीर्घकालीन आजाराने पीडित असलेल्या लोकांसाठी अधिक धोकादायक असू शकते.

रोगप्रतिकारक शक्ती ही व्हायरस, बॅक्टेरिया, परजीवी किंवा इतर हानिकारक सूक्ष्मजीवांमुळे होणाऱ्या रोग आणि संक्रमणांपासून संरक्षण प्रदान करण्याची क्षमता आहे म्ह्णूनच या पावसाळयामध्ये आजारी पडू नका. कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत, मधुमेहाने ग्रस्त रुग्णांची संख्या जास्त आहे कारण मधुमेहींच्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती कमी असणं, हे संसर्गाचं प्रमुख कारण आहे. सध्या मधुमेही रुग्णांना म्युकर मायकोसिस आजाराचा धोका आहे म्हणून उच्च मधुमेह असलेल्या नागरिकांनी पावसाळ्याचे हे तीन महिने जपणे महत्त्वाचे आहे. बुरशीच्या (Fungus) संसर्गाचा धोका अनेकांना असतो.

सायनसमध्ये (Sinus) नाकाभोवती असलेल्या मोकळ्या जागेत ही बुरशी साठून राहते. ही बुरशी हवेतून पसरते. ज्या व्यक्तीला याचा संसर्ग झाला आहे, अशा व्यक्तीकडून दुसऱ्याला संसर्ग होण्याची शक्यता असते, म्हणूनच म्युकरमायकोसिस’ आणि इतर अनेक रोगांवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सार्वजनिक स्वच्छतेला खूप महत्त्व दिलं पाहिजे. किंबहुना, सार्वजनिक स्वच्छता पाळणं, ही जनतेची आणि सरकारची सामूहिक बांधिलकी असली पाहिजे. त्यातून बुरशीचा फैलाव थांबवण्यास नक्कीच मदत होईल”

“पावसाळ्यात होणाऱ्या विविध आजारांमध्ये मलेरिया, डायरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया, टायफॉईड, व्हायरल इन्फेक्शन, अशक्तपणा, अतिसार, कावीळ आणि पोटदुखी अर्थात पोटविकारांचा त्यात समावेश होतो.पोटदुखी ही पावसाळ्यात गंभीर रुप धारण करू शकते. यामध्ये प्रामुख्याने उलटी, धाप लागणे, डायरिया आणि पोटात वेदना होणे या लक्षणांचा समावेश होतो व ही सर्व लक्षणे सध्या कोरोना ग्रस्त रुग्णांमध्ये आढळून येतात म्हणून येत्या तीन महिन्यात पावसाळ्यात होणाऱ्या या साथींपासून प्रतिबंधात्मक उपाय हाच पर्याय आपल्यासमोर आहे.

बदलते वातावरण आणि पाऊस आपल्यासाठी, आरोग्यासाठी धोकादायकही ठरू शकतो. म्हणूनच या काळात वातावरणात येणाऱ्या गारव्यामुळे फ्लूचा (ताप) धोका अधिक वाढतो. सरकारी आरोग्य यंत्रणेने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका व्यक्त केला असून जून जुलै व ऑगस्ट हे महिने नागरिकांच्या कसोटीचे ठरणार आहेत,” अशी माहिती नवी मुंबईतील नेरुळ येथील शुश्रूषा हार्ट केयर व स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक व हृदय शल्यविशारद डॉ. संजय तारळेकर यांनी दिली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.