कोविड-प्रेरित गठ्ठ्यांमुळे आता आतड्यात होऊ शकतो जीवघेणा गॅंग्रिन
सिटी बेल | मुंबई |आरोग्य प्रतिनिधी |
आपल्याला सर्वानाच माहित आहे की कोविड १९ मुळे शरीरात थ्रोम्बोजेनिक म्हणजेच क्लोट फॉर्मिंग स्थिती निर्माण होते त्यामुळे डॉक्टरांचे बहुतेक लक्ष फुफ्फुसांवर असते, परंतु आता क्लोट फॉर्मिंग म्हणजेच रक्ताच्या गुठळ्या फक्त फुफुसांमध्ये सीमित राहिल्या नसून शरीरातील मोठ्या आतड्यांमध्येसुद्धा बनत असून यावर योग्यवेळी उपचार झाले नाहीत तर ६० ते ८० टक्के कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू होतो तर अनेक केसेसमध्ये आतड्यांचा काही भाग काढून टाकणे अपरिहार्य ठरते.
जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार ज्या कोरोनाग्रस्त रुग्णांना आतड्यामध्ये संसर्ग झाला आहे अशा रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण अधिक असून मुंबईमध्ये अशा प्रकारचे डझनभर रुग्ण आढळले आहेत .
याविषयी अधिक माहिती देताना होली स्पिरीट हॉस्पिटलचे व्हॅस्क्युलर आणि एंडोव्हस्कुलर सर्जन व सल्लागार डॉ. अनिरुद्ध भुईआन म्हणाले, “कोरोनाग्रस्त असलेल्या रुग्णांमध्ये ओटीपोटात दुखणे, उलट्या सुरु होणे व पोटांच्या इतर समस्यांमध्ये वाढ होताना दिसते तसेच अशा पेशंटचे फुफुसाचे कार्य व्यवस्थित सुरु असते त्यामुळे अनेकवेळा अंदाज चुकतो व चुकीचे उपचार होतात. कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये जर तीव्र पोटदुखीची समस्या असेल तर त्याचे निदान सीटी स्कॅनद्वारे होऊ शकते कारण अशा पेशंटना वेदनाशामक औषधे देऊनसुद्धा काही उपयोग होत नाही. आजपर्यंत मी अशा मुंबईतील १० रुग्णांवर यशस्वी उपचार केले असून या रुग्णांचे आतडे वाचविण्यास मदत केली आहे, कारण हा आजार उपचाराराहीत जर राहिला तर ८ दिवसात आतड्याना गँगरीन होऊन काम करणे बंद करते.
आम्ही अशा केसमध्ये कोणतीही चिरफाड न करता दुर्बीणीद्वारे आतड्यामध्ये जमा झालेल्या रक्ताच्या गुठळ्या काढून टाकतो त्यामुळे रुग्णाला दोनच दिवसात बरे वाटून तो घरी जाऊ शकतो. आम्ही सर्वात लहान ३७ वर्षे व सर्वात जास्त ५८ वय वर्षाच्या रुग्णांवर मिनिमली इन्वसिव्ह वॉस्कुलर सर्जरी करून त्या रुग्णांचे प्राण वाचविण्यात यशस्वी झालो आहोत.”
फोर्टिस आणि ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये सल्लामसलत करणारे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल सर्जन डॉ. हेमंत पाटील यांना आतड्यांसंबंधी गॅंग्रिनची पाच प्रकरणे हाताळली असून गॅंग्रिन दूर करण्यासाठी दोन शस्त्रक्रिया केल्या आहेत, त्या सर्वांना तीव्र ओटीपोटात तीव्र वेदनाहोत होत्या, कोविड रूग्णांमध्ये आणि अगदी लसीकरण केलेल्या लोकांमध्ये आतड्यांसंबंधी गॅंग्रिनच्या घटनांमध्ये निश्चित वाढ झाली आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे.








Be First to Comment