प्रत्येक खाजगी तसेच शासकीय हॉस्पिटल व कोविड सेंटरमध्ये रुग्ण हक्काची सनद व दर फलक लावण्याची मागणी
सिटी बेल | रोहे | समीर बामुगडे |
प्रत्येक खाजगी तसेच शासकीय हॉस्पिटल व कोवीड सेंटरमध्ये रुग्ण हक्काची सनद व दर फलक लावण्याची मागणी नागरिकांकडून व सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे.
माहिती अधिकार कायदा कलम 4 एक (ख) नुसार व भारतीय आरोग्य परिषद यांनी मान्यता दिलेल्या रुग्ण हक्क सनद अनुसार नागरिकांना माहितीसाठी रुग्णालयाच्या दर्शनी भागावर सर्वाना पाहता व वाचता येईल असा माहिती फलक लावणे कायद्याने बंधनकारक आहे. सध्या कोविड या विश्वव्यापी महामारीने सर्वत्र हा:हाकार माजवला आहे सदर महामारी वर योग्य नियंत्रण आणण्यासाठी नाशिक मनपाने तसेच जिल्हा प्रशासनाने अनेक खाजगी हॉस्पिटलना, संस्थांना, कोविड सेंटर म्हणून परवानगी दिलेली आहे. सदर हॉस्पिटलमध्ये रुग्णांकडून कोविड उपचाराकरिता मनमानी पद्धतीने पैशाची लूट केली जात असल्याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत. सर्वसामान्य नागरिकांना कोविड उपचार घेताना सामान्य बेड पासून ते ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर, इंजेक्शन, औषधे यांच्या दराबद्दल कोणतीही माहिती नसते त्याचा गैरफायदा घेत खाजगी रुग्णालये, संस्था, रुग्णांची आर्थिक लूट करीत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. यामध्ये एक लाखांपासून ते दहा लाखांपर्यंतची बिले कोविड उपचारासाठी वसूल केल्याचे दिसून आले आहे.
जेव्हा खाजगी रुग्णालयाला मनपा कोविड उपचाराची परवानगी देते तेव्हा त्याठिकाणी सर्व शासकीय नियम व कायदे आपोआपच लागू होतात त्यामुळे माहिती अधिकार कायदा कलम 4 एक (ख) नुसार सर्व खाजगी रुग्णालयांमध्ये कोविंड संदर्भातील उपचाराकरता सामान्य बेड, ऑक्सीजन बेड, व्हेंटिलेटर बेड तसेच विविध इंजेक्शन व औषधे याबाबत सविस्तर दरफलक, शिवाय ऍम्ब्युलन्सचे दर फलक आणि बिलाबाबत ऑडिटसाठी मनपाचे ऑडिटर यांचे नाव व संपर्क क्रमांक यांचा दरफलक हे हॉस्पिटलने त्यांच्या प्रवेशद्वाराजवळ नागरिकांना सहज दिसेल अशा ठळक अक्षरात लावणे बंधनकारक करावे व ते लावले आहेत का नाही याची खातरजमा करण्याकरता भरारी पथके नेमावीत जेणेकरून गोरगरीब रुग्णांची खाजगी रुग्णालयामध्ये चाललेली आर्थिक लूट थांबू शकेल अशी मागणी सर्वसामान्य नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे.








Be First to Comment