शेवटच्या श्वासापर्यंत भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी झटणाऱ्या दि बा पाटील यांचे नाव विमानतळाला दिले गेले पाहिजे : न्हावा सरपंच जितेंद्र म्हात्रे
सिटी बेल । न्हावे ।
नवी मुंबई विमानतळाला कोणाचे नाव द्यावे याचा वाद सध्या सर्वत्र गाजत आहे. सर्वपक्षीय कृती समितीने व्यापक आंदोलनाचा इशारा दिला आहे. 10 जून रोजी मानवी साखळीच्या माध्यमातून राज्य शासनाला गर्भित इशारा देण्यात येणार आहे. राज्य सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास 24 जून रोजी सिडको मुख्यालयाला घेराव घालण्यासाठी स्थानिक भूमिपुत्र आणि प्रकल्पग्रस्त बांधव सरसावले आहेत. या पार्श्वभूमीवर आमच्या प्रतिनिधीने न्हावा ग्रामपंचायतीचे सरपंच जितेंद्र म्हात्रे यांच्याशी चर्चा केली असता,शेवटच्या श्वासापर्यंत भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी झटणाऱ्या दि बा पाटील यांचे नाव विमानतळाला दिले गेले पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली.
जितेंद्र म्हात्रे म्हणाले की माजी खासदार लोकनेते दि बा पाटील आणि सन्माननीय बाळासाहेब ठाकरे ही दोन्ही दिग्गज व्यक्तिमत्त्व आहेत. परंतु 1971 सालि या ठिकाणी आलेल्या सिडकोने जेव्हा 95 गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहीत केल्या, तेव्हा प्रकल्पग्रस्त बांधवांना आणि स्थानिक भूमिपुत्रांना न्याय लोकनेते दि बा पाटील यांनी मिळवून दिला आहे. आज भूमिपुत्र आणि प्रकल्पग्रस्त बांधव जर का उत्कर्षाचे जिणे जगत आहेत तर ते केवळ दि बा पाटील साहेबांमुळे. त्यांनी केलेला उठाव व अभ्यासपूर्ण पद्धतीने मिळवलेली साडेबारा टक्के परतावा योजना ही अभूतपूर्व आहे. आपल्या पुढच्या पिढ्यांना दि बा पाटील यांचे कार्य किती महान होते याची पदोपदी आठवण सांगण्यासाठी विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव दिले पाहिजे.
याबाबत अधिक माहिती देताना सरपंच जितेंद्र म्हात्रे म्हणाले की, आमच्या ग्रामपंचायतीने हा वाद निर्माण होण्या पूर्वीच 25 जानेवारी 2019 च्या मासिक सभेत ठराव क्रमांक 203 अनुसार आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नवी मुंबई विमानतळाला माजी खासदार लोकनेते दि बा पाटील यांचेच नाव दिले पाहिजे अशी भूमिका घेतली आहे. सन्माननीय नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मागणीनुसार सिडकोने ठराव पारित करण्यापूर्वीच आम्ही आमची भूमिका स्पष्ट केल्यामुळे यात कुठलाही राजकीय वाद उफाळून येण्याची शक्यताच नाही.
मी स्वतः अवघ्या 13 वर्षाचा असताना जासई आंदोलनामध्ये सहभागी झालो होतो. अर्थातच मी आईचा हात पकडून आंदोलनात गेलो होतो. आंदोलनाने हिंसक रूप घेतल्यानंतर वाट फुटेल तिथे पळावे लागले. तेव्हा जासईहून आमच्या गावात येण्यासाठी आम्हाला सोनारी मग शेवा आणि तिथून मग तर पकडुन गावात यावे लागले होते. पुढे 1993 सली मी अवघ्या 23 वर्षाचा असताना सरपंच झालो. सर्वात तरुण सरपंच म्हणून माझी त्या काळी नोंद घेतली गेली. लोकनेते दि बा पाटील यांचा आशीर्वाद घेण्यासाठी गेलो असता त्यांनी अत्यंत आपुलकीने मला मार्गदर्शन केले. माझ्या घरी ते सहकुटुंब वास्तुशांती निमित्त येऊन गेले होते तत्पुर्वी माझ्या घराचे काम सुरू असताना देखील त्यांनी येऊन भेट दिली होती.
Be First to Comment