Press "Enter" to skip to content

जागतिक तंबाखू विरोधी दिन – ३१ मे २०२१


कोरोना संक्रमण कालावधीत तंबाखू सेवनाचे प्रमाण वाढले

लॉकडाउन काळात १०० रुपयांचे सिगारेट पाकीट ४०० रुपयाला घेणाऱ्या नागरिकांना आरोग्याचे गांभीर्य नाही

सिटी बेल । आरोग्य प्रतिनिधी ।

दरवर्षी ३१ मे हा दिन जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो व प्रत्येक वर्षी एक थीम ठरवून नागरिकांमध्ये जनजागृती केली जाते. यावर्षी “तंबाखू सोडण्यासाठी वचनबद्ध” ही थीम ठरली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने १९८७ सालापासून हा दिन साजरा होत असला तरी तंबाखूच्या सेवनाने मृत्यमुखी होण्याच्या संख्येत वाढच होत असल्याचे निदर्शनास आले आहे म्हणून जागतिक आरोग्य संघटना दरवर्षी तंबाखू मुक्त समाज करण्यासाठी अनेक पातळीवर प्रयत्न करीत आहे.

२०१९ च्या अखेरीस कोरोनाचे संकट संपूर्ण भारतावर आले असून महाराष्ट्रामध्ये आजमितीला कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण आढळून येत आहे, केंद्र सरकार तसेच महाराष्ट्र सरकार या संकटाचा सामना मोठ्या हिमतीने करत असून दुसऱ्या लाटेवर नियंत्रण आणण्यात आपण यशस्वी झालो आहोत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महाराष्ट्रात लॉक डाउन करण्यात आले व अनेक नागरिक आपल्या घरीच अडकून पडले असून या काळात अनेक नागरिकांमध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण वाढीस लागल्याचे समोर आले आहे. नवी मुंबईतील नेरुळ येथील शुश्रूषा हार्ट केयर व स्पेशालिटी हॉस्पिटलच्या एका सर्वेक्षणानुसार कोरोना संक्रमण कालावधीत १० ते १५ टक्के नागरिकांमध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण वाढले असून याचे थेट दुष्परिणाम ह्रदयावर होत असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.

गेल्या महिन्याभरात शुश्रूषा हार्ट केयर मध्ये २०० नागरिकांच्या सर्वेक्षणात ही बाब पुढे आली असून घरामध्ये कंटाळा आल्यामुळे आम्ही सिगारेट व तंबाखू सेवन करणाऱ्यांचे प्रमाण ५० टक्के आहे. याविषयी अधिक माहिती देताना शुश्रूषा हार्ट केयर व स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक व हृदय शल्यविशारद डॉ. संजय तारळेकर सांगतात, ” हृदय हा शरीराचा अतिशय महत्त्वाचा अवयव असून हा एका विशिष्ट मांसाने बनलेला असतो व त्याला त्याला शुद्ध रक्तपुरवठा करणारे स्वत:चे जाळे असते. या रक्तवाहिन्यांच्या जाळय़ामधून हृदयास साखर, प्राणवायू व इतर आवश्यक घटक प्रत्येक भागात पोहोचतात परंतु जेंव्हा सिगारेटचा धूर हृदयात जातो त्यावेळी या धुराबरोबर कार्बन मोनॉक्‍साइड वायू अधिक, तर प्राणवायू शरीरात कमी शोषला गेल्याने शरीरातील पेशींना प्राणवायू कमी मिळते, यामुळे धमनी-काठिण्य वाढते. रक्तवाहिन्या अशुद्ध होऊन हृदयविकाराचा धोका वाढतो.

सिगारेटच्या धुराबरोबर शरीरात ओढल्या जाणार्‍या निकोटीनमुळे अ‍ॅड्रेनलाइन अधिक प्रमाणात तयार होते व त्यामुळेही हृदय अधिक वेगाने आणि जोर जोरात धडधडू लागते. या सगळ्या कारणांमुळे हार्ट फेल्युअरचा धोका आपोआपच वाढतो.तंबाखूमुळे हृदय रोग, कर्करोग, यकृताचा आजार, फुफ्फुसाचे आजार, टि.बी. यासारख्या प्राणघातक आजारांना बळी पडतात. पक्षाघात, मोतीबिंदू, नपुंसकत्व, कमी वजनाचे व्यंग असलेले-मृत्यू पावलेले बाळ जन्माला येणे यासारख्या व्याधी जडण्याचे प्रमाणही वाढते. यामुळे लोकांमध्ये अकाली मृत्यूचे प्रमाण वाढलेले आहे. देशात बिडी, गुटखा, तंबाखू, सिगारेट, मावा, खैनी, मिसरी, चिलीम यासारख्या तंबाखूच्या पदार्थांचे व्यसन मोठ्या प्रमाणात केले जाते. तंबाखू आरोग्याला घातक आहे.

तंबाखूमुळे हृदयविकार- कर्करोग होतो, हे माहीत असूनही अनेक तरुण आज तंबाखूच्या व्यसनाच्या आहारी गेले आहेत आणि धोके माहीत असूनही जात आहेत, हे चिंताजनक आहे. “
तरुण पिढी व तंबाखूचे व्यसन याविषयी अधिक माहिती देताना कल्याण येथील स्टारसिटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक व फिजीशियन आणि इंटेंसिव्हिस्ट डॉ. प्रदीप शेलार म्हणाले, “सध्या भारतात वयाच्या अवघ्या नवव्या आणि दहाव्या वर्षी तंबाखू सेवनास सुरुवात करणारी मुले आहेत.त्यामुळे तंबाखूशी निगडित आजार वाढले आहेत. धूम्रपान करणाऱ्या ७० टक्के लोकांना धूम्रपानामुळे होणा-या दुष्परिणामांची जाणीव असते आणि यातील ५० टक्के लोकांची ही सवय सोडण्याची इच्छा असते, मात्र सततच्या धूम्रपानाच्या सवयीमुळे संबंधित व्यक्तीच्या शरीरावर निकोटिनचा प्रभाव पडलेला असतो, त्यामुळे ही सवय सुटता सुटत नाही. निकोटिन रिप्लेसमेंट थेरपीफ (एनआरटी) हा उपचार करून धूम्रपानाची सवय सोडता येते, मात्र कायमस्वरूपी हे व्यसन सोडणे व्यक्तीच्या इच्छेवरच अवलंबून असते.व्यसनाधिनतेचे परिणाम आपल्या आजूबाजूला व्यसनामध्ये अडकलेल्या लोकांना सांगुन त्यांना व्यसनापासून रोखणे व त्यांना त्यापासून परावृत्त करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.

एका वैद्यकीय सर्वेक्षणानुसार तंबाखूचे सेवन करणारा माणूस हा नेहमीच मानसिक ताणतणावाखालीच आढळतो अशावेळी त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीने त्याचे हे व्यसन सोडण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे , अनेकवेळा हे प्रयत्न होताना दिसत नाहीत याउलट अनेक वेळा कुटुंबातील इतर सदस्य त्या व्यक्तीसोबत तंबाखू सेवन करताना दिसतात , ग्रामीण भागामध्ये तंबाखू सेवन वाढण्याचे हेच मुख्य कारण आहे.”

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.