सिटी बेल । पेण । वार्ताहर ।
पेण तालुक्यात होऊ घातलेल्या एमआयडीसी प्रकल्पाविरोधात जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष परशुराम म्हात्रे यांच्यासह प्रकल्पग्रस्तांनी दिनांक 22 मे रोजी विधीमंडळाचे माजी अध्यक्ष तथा कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना वडखळ येथे निवेदन दिले.
नुकताच झालेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी नाना पटोले पेण येथे आले असता त्यांचे वडखळ नाक्यावर कार्यकर्त्यांनी स्वागत केले यावेळी येथील प्रकल्पग्रस्तांनी सदर निवेदन देऊन हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली. या निवेदनात पेण तालुक्यातील डोलवी , गडबड ,वडखळ परिसरात सदर प्रकल्प येत असून हा प्रकल्प येथील शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा आहे.या अगोदरच येथील कंपन्यांमुळे प्रदुषणात भर पडल्याने येथील शेती, मच्छीमारी हे व्यवसाय नष्ट होत असतांना नव्याने येणारा एमआयडीसी प्रकल्प आम्हाला नको आहे अश्या मागणीचे निवेदन नाना पटोले यांना देण्यात आले आहे.
यावेळी डोलवी ग्रामपंचायत सदस्य तथा जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष परशुराम म्हात्रे, पं.स. सदस्य प्रदीप म्हात्रे, माजी सदस्य प्रभाकर पाटील पंचक्रोशी शेतकरी विकास मंच अध्यक्ष निलेश म्हात्रे,पेण शहर अध्यक्ष प्रवीण पाटील, नंदा म्हात्रे, सरचिटणीस राजा म्हात्रे आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी पेण तालुक्यातील गागोदे आदिवासी वाडीवरील मृत्यू पावलेल्या कुटुंबीयांना कॉंग्रेस उपाध्यक्ष परशुराम म्हात्रे यांच्याकडून अन्नधान्य देण्यात आले.








Be First to Comment