Press "Enter" to skip to content

खारघर, कळंबोली, तळोजातील नागरिकांच्या पाणीप्रश्नावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमक

पाणीटंचाईकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाला जाब विचारणार : उपनेते बबन पाटील



पनवेल, दि.१९ (वार्ताहर) : खारघर, कळंबोली आणि तळोजा या सिडको वसाहतींमध्ये अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून, पाण्याची उपलब्धता अपुरी असतानाही नवीन बांधकामांना परवानग्या आणि भोगवटा प्रमाणपत्रे देण्याच्या धोरणावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते बबन पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. गणेशोत्सवानंतर सिडकोकडे पाणीप्रश्नाबाबत जाब विचारणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कळंबोलीला दररोज सुमारे ३० एमएलडी पाण्याची गरज असताना २२ एमएलडी, खारघरला ८५ एमएलडीची आवश्यकता असताना ७५ एमएलडी, तर तळोजाला २२ एमएलडी गरज असताना केवळ ८ एमएलडी पाणी मिळत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे या भागांतील नागरिकांना नियमित पाणीपुरवठ्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.

पाण्याची कमतरता असतानाही मोठ्या प्रमाणावर नवीन बांधकामांना परवानग्या दिल्या जात असल्याने भविष्यात पाणीटंचाईचे संकट आणखी तीव्र होण्याची शक्यता असल्याचे बबन पाटील यांनी म्हटले आहे. पनवेलकरांसाठी स्वतंत्र जलस्रोत निर्माण करण्याला अनेक वर्षे प्राधान्य देण्यात आले नाही. परिणामी आज नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचा आरोप त्यांनी केला.

पनवेलची भविष्यातील पाण्याची गरज भागविण्यासाठी शिलार धरणातून पाणी आणण्याचे नियोजन असून त्यासाठी आणखी काही वर्षांचा कालावधी अपेक्षित आहे. तसेच पाताळगंगा नदीतून अतिरिक्त पाणी आणण्यासाठी प्रस्तावित जलवाहिनीचे कामही विलंबाने सुरू असल्याने सध्याच्या पाणीप्रश्नावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे पाटील यांनी सांगितले.

“पाण्याची कमतरता असतानाही नवीन बांधकामांना परवानग्या आणि भोगवटा प्रमाणपत्रे दिली जात आहेत. प्रशासनाने भविष्यातील पाणीटंचाईचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक होते. गणेशोत्सवानंतर सिडकोला याबाबत जाब विचारण्यात येईल,” असे बबन पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, पाणीप्रश्न सुटेपर्यंत पनवेल महापालिका आणि सिडकोने नागरिकांना मोफत टँकरद्वारे पाणी उपलब्ध करून द्यावे, तसेच पुरेसा पाणीपुरवठा होईपर्यंत नवीन बांधकामांना परवानगी देऊ नये आणि भोगवटा प्रमाणपत्रे देण्यास स्थगिती द्यावी, अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.