राम मंदिराची भिंत कोसळून २ महिलांचा दुर्दैवी मृत्यू ; दोन दिवसांपासून उरण अंधारात
सिटी बेल । उरण । घन:श्याम कडू ।
रायगड जिल्ह्यात तौत्के चक्रीवादळाचा जोरदार प्रभाव पहायला मिळत आहे. मध्यरात्री 2 वाजल्यापासून जिल्ह्यात तुफानी वार्यासह मुसळधार पाऊस सुरु आहे. या वादळी वार्यात उरणमध्ये राम मंदिराची भिंत कोसळून २ महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. मुसळधार वादळी पावसामुळे वीज गायब झाल्याने उरण अंधारात आहे.
उरण शहरातील गणपती चौकात राम मंदिराचे बांधकाम सुरू आहे. बांधकाम सुरू असताना खबरदारी घेण्यात आल्याचे दिसतं नाही. या बांधकाम सुरू असलेल्या मंदिराच्या खाली महिला भाजी विक्रीसाठी नेहमी बसत असत. आज सकाळी ही महिला भाजी विक्रीसाठी बसल्या होत्या. काल पासून जिल्ह्यात ताउक्ते चक्रीवादळ सुरू झाले होते. आज पहाटे पासून उरण परिसरात मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याने झोडपण्यास सुरुवात केली.
सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास बांधकाम केलेल्या मंदिराचा काही भाग कोसळला. सदर बांधकाम हे भाजी विक्री करणाऱ्या महिलांच्या अंगावर पडले. त्यात सुनंदाबाई भिमनाथ घरत रा. नागाव व नीता भालचंद्र नाईक, रा.अवेडा केगाव या दोन महिला गंभीर जखमी झाल्या. त्यांना त्वरित इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी नीता भालचंद्र नाईक यांना मयत झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. तर सुनंदाबाई भिमनाथ घरत यांना पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. परंतु उपचार सुरु असतानाच त्यांचाही मृत्यू झाला.
राम मंदिराच्या नवीन भिंतीचे बांधकाम कोसळून २ महिलांचा मृत्यू झाल्याने सदर बांधकामांबद्दल जनतेत संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती उरणचे मुख्याधिकारी संतोष माळी यांनी दिली.
उरण तालुक्यात इतर दुर्घटना घडली नसून अनेकांच्या घरावरील पत्रे उडून मालमत्तेचे नुकसान झाले आहे. आज पहाटे उरणकरांना मुसळधार वादळी पावसाने झोडपून काढले आहे. यामुळे वीज गायब असल्याने उरणकर अंधारात चाचपडत आहेत.










Be First to Comment