Press "Enter" to skip to content

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या नागोठण्यातील जागेत अनधिकृत भराव

नागोठणे तलाठ्यांकडून अनधिकृत भरावाचा पंचनामा

जागा हडपण्याचा प्रयत्न : स्थानिकांची तक्रार : कारवाईस विलंब

सिटी बेल । नागोठणे । महेश पवार ।

नागोठण्यातील जागांचे एक-एक गुंठ्यांचे भाव गगनाला भिडलेले असतांनाच सध्या तर एक फुट जागेलाही सोन्याचा भाव आला आहे. त्यामुळे सद्य स्थितीत जागा विकत घेणे सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर झाले असून मोक्याची जागा तर सोडाच आजूबाजूच्या परिसरातही सध्या जागा घेणे कठीण झाले आहे. अशातच काहींची वक्र दृष्टी सरकारी जागांकडे वळली असून ती जागा हडप करण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत.

असाच काहीसा एक प्रकार नागोठण्यातील मोहल्ला भागातील तरुणांनी उघडकीस आणला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित असलेल्या व नागोठण्यातील मुंबई गोवा महामार्गालगतच असलेल्या पिराचा माळ नामक उल्लेख असलेल्या परिसरात तसेच नागोठणे – पेण जुन्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या सरकारी जागेवर अनधिकृत भराव करून ती जागा हडप करण्याची हिंमत करणाऱ्या या महाभागांना नक्की कोणाचा आशीर्वाद आहे याची उलट-सुलट चर्चा आता नागोठण्यात होत आहे.

यासंदर्भात उपलब्ध झालेल्या माहितीनुसार सार्वजनिक बांधकाम खात्याच्या नागोठणे येथील गट नं. १२७ चा २ ब मधील सुमारे दोन गुंठे एवढ्या मोठ्या व खूप खोल असलेल्या जागेवर नागोठणे मोहल्ल्यातीलच एक व्यक्तीने मोठ्या प्रमाणात मातीचा भराव केल्याचे येथील मोहल्ला भागातील नागरिकांनी रोहाच्या तहसीलदार कविता जाधव यांच्या गेल्या महिन्यात निदर्शनास आणून दिले. त्यानुसार नागोठणे तलाठी गणेश विटेकर यांनी सदर जागेवर स्वतः जावून मोहल्ल्यातील अशपाक सुमरा, काझीम पानसरे व अन्य पंचा समक्ष पंचनामा करून सदर पंचनामा पुढील कार्यवाहीसाठी रोहा तहसील कार्यालयाकडे पाठवून दिला आहे.

दरम्यान यासंदर्भात बेकायदेशीर भराव करणाऱ्या संबधितांना नोटीस बजावण्यात येणार असल्याचे रोहा तहसील कार्यालयातील अव्वल कारकून बालाजी देशमुख यांनी ३० एप्रिल, २०२१ रोजी सांगितले होते. मात्र याप्रकरणी संबधितांवर अद्याप कोणतीच कारवाई झाली नसल्याने आशर्य व्यक्त करण्यात येत आहे. तर सदर नोटीस लवकरच तहसील कार्यालयातून आणून त्यानंतर ती संबधित व्यक्तीला बजावण्यात येईल असे नागोठणे तलाठी गणेश विटेकर यांनी सांगितले.

त्यामुळे आता रोहा तहसील कार्यालयाकडून तसेच जागा मालक असलेल्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडून याप्रकरणी संबधितांवर काय कारवाई होते याकडे मोहल्ला तसेच नागोठण्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.