सिटी बेल । नवी दिल्ली।
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. गेल्या आठवड्यात एका दिवसात 4 लाख नवे कोरोना रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे केंद्र सरकारची चिंता वाढली होती. मात्र, चालू आठवड्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याचा दावा सरकारकडून करण्यात आलाय. देशातील 18 राज्य आणि केंद्राशासित प्रदेशात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचा दावा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून नियमावलीत शिथिलता देण्यात आलीय.
केंद्र सरकारने मंगळवारी कोरोना टेस्टिंगबाबतच्या नियमावलीत काही बदल केले आहेत.त्यानुसार एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करायचा झाल्यास RT_PCR टेस्ट करणं आता बंधनकारक असणार नाही. कोरोनाचा प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्य सरकारांनी आपल्या राज्यात प्रवेश करण्यासाठी RT_PCR टेस्ट निगेटिव्ह असणं बंधनकारक करण्यात आलं होतं. खासकरुन महाराष्ट्रातून येणाऱ्या नागरिकांना अन्य राज्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली होती.
RT-PCR टेस्ट न करता डिस्चार्ज मिळणार
कोरोनाबाबत केंद्राच्या नव्या नियमावलीनुसार कोरोना रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज घेताना आता RT-PCR टेस्ट बंधनकारक नसेल. मात्र, डिस्चार्ज मिळवताना रुग्णाच्या कोरोना लक्षणांमध्ये मोठी सुधारणा गरजेची आहे. कोरोना रुग्णाला 5 दिवसांपासून ताप नाही, तर त्याला रुग्णालयातून सुट्टी घेताना RT-PCR टेस्ट करणं गरजेचं नसेल.
18 राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशात काही राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचं म्हटलंय. त्यात दिल्ली, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, राजस्थान, हरियाणा, छत्तीसगड, उत्तराखंड, तेलंगणा, चंदीगड, लडाख, दीव-दमण, लक्षद्वीप आणि अंदमान निकोबार या राज्यांचा समावेश आहे.








Be First to Comment