संत निरंकारी मंडळाचा कोरोना काळात स्तुत्य उपक्रम
आमदार भरत गोगावले यांनी मानले आभार
सिटी बेल । महाड । रघुनाथ भागवत ।
कोरोना महामारीमध्ये कोरोना रुग्ण कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. त्यांच्या जेवणाची सोय करण्यात येते, पण खरी फरपट होत आहे, ती म्हणजे संबंधित रुग्णांच्या नातेवाईकांची. कारण टाळेबंदी असल्याकारणाने सर्वच दुकाने बंद आहेत. त्यामुळे त्यांच्या तसेच होमआयसोलेशन असणाऱ्यांची जेवणाची गैरसोय होत आहे. हीच दखल घेत सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या कृपेने संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन दिल्ली, झोन रायगड यांच्या वतीने ब्रँच महाड व बिरवाडी येथील सेवादल यांच्यामार्फत मोफत चहा, नाश्ता बरोबरच उत्तम जेवणाची सोय उपलब्ध करून दिली आहे.
मानवतेच्या निष्काम सेवांमध्ये संत निरंकारी मंडळ नेहमीच अग्रेसर राहिले असून कोरोना काळातही रक्तदान शिबिर त्याचबरोबर गरजूंना मोफत जीवनावश्यक साहित्याचे वाटप असे उपक्रम तसेच 24 एप्रिल पासून दिल्ली येथील संत निरंकारी सत्संग भवनाचे दिल्ली सरकारच्या सहयोगाने 1 हजार पेक्षा अधिक खाटांच्या कोविड ट्रीटमेंट सेंटरमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. तेथे पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चरसह हे सेंटर मानवतेच्या सेवेमध्ये समर्पित करण्यात आले आहे.

त्याच अनुषंगाने गेली दहा दिवसांपासून महाड एमआयडीसी येथील कोविड सेंटर येथे संत निरंकारी चॅरीटेबल फाउंडेशन दिल्ली रायगड झोनचे झोनल प्रबंधक प्रकाश म्हात्रे व रायगड क्षेत्राचे क्षेत्रीय संचालक प्रवीण पाटील, महाड संयोजक दयाळ पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली सेवादल युनिट महाड व बिरवाडी यांच्यातर्फे सेवादल महात्मा व भगिनी यांच्याकडून दररोज मोफत चहा, नाश्ता व उत्तम दर्जाचे जेवण टिफिन स्वरूपात देण्याची सोय दरदिवशी 80 हुन अधिक गरजूंना उपलब्ध करण्यात आली आहे. संत निरंकारी मंडळाच्या या मानवतेच्या कार्यासंदर्भात आमदार भरत गोगावले व तेथील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी संत निरंकारी मंडळाचे आभार मानले आहेत.
सध्याच्या कोरोनाच्या चिंताजनक वातावरणात मानवतेच्या दृष्टिकोनातून होणारी ही संत निरंकारी मंडळाकडून विशेष सेवा पाहता कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांनी देखील समाधान व्यक्त केले आहे. कोविड सेंटरच्या ठिकाणी रुग्णांच्या नातेवाईकांना कोविडचे सर्व नियम तंतोतंत पालन करून बिरवाडी सेवादल युनिटचे संचालक काशिनाथ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाच्या सेवादलांतर्फे सकाळ संध्याकाळ चहा, नाश्ता व जेवणाची टिफिन दिली जात आहे.








Be First to Comment