Press "Enter" to skip to content

कोरोना न झालेले नागरिक अतिप्रमाणात करीत आहेत काढ्याचे सेवन

शहरी भागामध्ये डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय केलेल्या उपचारांमुळे कोरोना संक्रमणात होत आहे वाढ

सिटी बेल । आरोग्य प्रतिनिधी ।

साथीच्या रोगांच्या बाबतीत शास्त्र असं सांगतं की, रोगाची लाट येते किंवा लाटा येतात तेव्हा त्यांचा एक उच्चांक किंवा पीक येतो आणि पीकवर काही काळ थाबल्यानंतरच लाटेचा भर ओसरायला सुरुवात होते.आता देशात दुसरी कोरोना लाट थैमान घालतेय. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार लोकसंख्या जास्त असलेल्या राज्यांना धोका जास्त असतो व त्यानुसार सध्याच्या घडी महाराष्ट्रामध्ये रुग्णसंख्या वाढत  असून कोरोना  संसर्ग ग्रामीण व शहरी  भागात सुद्धा पसरत आहे.

आपल्याला कोरोना होऊ नये यासाठी नागरिकांना शासनाने नियम व अटी घालून दिल्या आहेत. मास्क घालणे, सोशल डिस्टंसिंग सांभाळणे, हात धूत रहाणे व थोडा जरी ताप आला अथवा सर्दी झाली तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधोपचार घेणे गरजेचे आहे परंतु आज सोशल माध्यमांच्या माध्यमातून प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांचा आधार घेऊन कोरोनाची लक्षणे आढळून आल्यावर घरच्या घरी उपचार घेत असल्यामुळे आरोग्य समस्यांमध्ये वाढ होत असल्याचे निरीक्षण  वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

याविषयी अधिक माहिती देताना कल्याण येथील स्टारसिटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक व  फिजीशियन आणि इंटेंसिव्हिस्ट डॉ. प्रदीप शेलार  म्हणाले , ” बरेच लोक रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी व्हिटॅमिन सीच्या गोळ्या खातात. परंतु अति गोळ्या खाणे आपणास हानी पोहचू शकते.व्हिटॅमिन सीच्या गोळ्या खाताना वृद्ध, दम्याचे रुग्ण, मधुमेह आणि हृदय रोगाच्या रुग्णांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे., व्हिटॅमिन सीच्या गोळ्यांचे अति सेवन टाळून आपल्या आहारात फळे आणि भाज्यांचा समावेश करा. उच्च रक्तदाब व मधुमेह असलेल्या नागरिकांनी व्हिटॅमिनसीच्या स्वरूपात घेतलेले सप्लीमेंट हानिकारक ठरु शकते. त्यामुळे त्याचे अतिसेवन टाळावे,  व्हिटॅमिन सीच्या अतिसेवनामुळे मूत्रपिंडातील स्टोन, अतिसार सारख्या समस्या उध्दभवू शकतात म्हणूनच डॉक्टरांच्या सल्ल्यानेच गोळ्या घेणे गरजेचे आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी अनेक नागरिक वेगवेगळ्या प्रकारच्या काढ्यांचे सेवन करीत आहेत  काढा पित आहेत. काढा पिणे आपल्यासाठी फायदेशीर असले तरी उन्हाळ्यात अधिक काढा पिणे नुकसानदायी होऊ शकते. अधिक काढा प्यायल्याने पोटात जळजळ, नाक सुकणे किंवा नाकातून रक्त येणे आदि समस्या होऊ शकतात. गरमीमध्ये अधिक काढा प्यायल्यास गॅस, जळजळ तसेच पोटातील अल्सर, पाइल्स आदि समस्या होऊ शकतात.”

कोरोना  होऊ नये म्हणून काय करावे, रोगप्रतिकारशक्ती कशाने वाढते याच्या दररोज शेकडो पोस्ट्स व्हॉट्सअँपवर  येत असून अनेक नागरिक औषध दुकानांमध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या औषधांसाठी गर्दी करीत आहेत. त्याचप्रमाणे वाफ घेण्याच्या मशिनचीही तडाखेबाज विक्री झाली. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आपल्याला संसर्ग होऊ नये म्हणून नागरिक डॉक्टरांचा सल्ला न घेता घरामध्ये कापूर जाळणे, कडू काढे घेणे , सर्दी ताप झाल्यावर वाफ घेत राहणे व कोरोनाची तपासणी न करणे यासारख्या चुकांमुळे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. कसलेच इन्फेक्शन नसले तरी बरेच जण काढे प्यायला लागले. हळूहळू इतके लोक काढे प्यायला लागले आहेत की त्याचे विपरीत परिणाम शरीरावर होत आहेत. काढ्यांमध्ये असलेली अनेक  औषधे उष्ण असल्यामुळे पोटात आग पडणे, पित्ताचा त्रास होणे, डोळ्यांची आग होणे, लघवीला जळजळ होणे, शौचाच्या जागी आग होणे, शौचावाटे रक्त पडणे, लघवीला पिवळी होणे अशी लक्षणे दिसायला लागली त्याहीपुढे जाऊन काहीना मूळव्याधीचा त्रास सुरू झाला आहे, काढ्याने शरीराला अनेक फायदे मिळत असले तरी अतिसेवनाचे दुष्परिणामही आहेत. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने काढ्याचे सेवन करा.,अशी माहिती स्टारसिटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक व  फिजीशियन आणि इंटेंसिव्हिस्ट डॉ. प्रदीप शेलार यांनी दिली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.