जेएसडब्ल्यु जलवाहिनीच्या निमित्ताने ३० वर्षे जपला जिव्हाळा
सिटी बेल । नागोठणे । महेश पवार ।
नागोठण्याजवळील के.टी. बंधा-यातून डोलवी (ता.पेण) येथे नेण्यात आलेल्या व डोलवी पर्यंतच्या ४५ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या जेएसडब्ल्यु कंपनीच्या जलवाहिनीशी निगडीत युटिलिटी-पाणीपुरवठा विभागाचे उपव्यवस्थापक मुरलीधरन नायर हे कंपनीतील ३० वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर गरुवार दि. ३० एप्रिलला सेवानिवृत्त झाले.
जेएसडब्ल्यु कंपनीच्या जलवाहिनीच्या निमित्ताने मुरली नायर यांनी नागरिकांशी जपलेल्या जिव्हाळ्यामुळे त्यांना अनेक नागरिकांनी त्यांच्या सेवानिवृत्त निरोगी दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

मुरलीधरन नायर हे ३० जुन, १९९२ जेएसडब्ल्यु (त्यावेळच्या इस्पात) कंपनीसाठी नागोठण्याजवळील के.टी. बंधा-यातून डोलवी (ता.पेण) येथे नेण्यात येणाऱ्या जलवाहिनीच्या कामात सुपरवायझर म्हणून नोकरीत रूजू झाले होते. त्यांच्याच देखरेखीखाली जेएसडब्ल्यु कंपनीच्या या जलवाहिनीचा पाणीपुरवठा सुरु झाला होता. ही जलवाहिनी कधी कुठे फुटली वा नादुरूस्त झाली की, ही जलवाहिनी पूर्ववत सुरु होईपर्यंत मुरलीधरन नायर यांना चैन पडत नसे. स्वतः कामाच्या ठिकाणी उभे राहून ते काम पूर्ण करून पाणीपुरवठा सुरळीत झाल्यानंतर त्यांना एक वेगळेच मानसिक समाधान मिळत असे. जलवाहिनी बंद झाल्यानंतर ती दुरूस्त होईपर्यंत अनेक नागरिकांतून चौकशी साठी आलेले फोनही ते उचलून त्यांना योग्य ती माहिती देत असत. त्यामुळे मुरली नायर आणि जेएसडब्ल्युची जलवाहिनी हे एक समीकरण तयार झाले होते. जेएसडब्ल्यु कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करीत असतांनांच आपल्या कार्यतत्परतेमुळे त्यांना उपव्यवस्थापक पदापर्यंत बढती मिळाली होती. याच पदावरून ते सेवेतून निवृत्त झाले.
जेएसडब्ल्यु कंपनीत झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात मुरलीधरन नायर यांना सेवानिवृत्ती बद्दल निरोप देण्यात आला. जेएसडब्ल्युच्या युटिलिटी विभागाचे महाव्यवस्थापक शरद मिश्रा, आॅक्सीजन प्लँटचे महाव्यवस्थापक विनय नेने, युटिलिटी विभागाचे सहाय्यक महाव्यवस्थापक सी.ए. करंजकर आदींनी यावेळी मुरली नायर यांना सेवानिवृत्ती बद्दल व सेवानिवृत्त निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.








Be First to Comment