Press "Enter" to skip to content

सलून दुकान धारकांवर उपासमारीची वेळ

सलून चालकांनाही सवलत द्या : खा. तटकरे यांना जिल्हा नाभिक तरुण संघांचे साकडे

सिटी बेल । नागोठणे । महेश पवार ।

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर शासनाने सलून दुकानांव्यतिरिक्त इतर सर्व दुकान धारकांना सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत दुकाने चालू ठेवण्याची परवानगी दिल्यामुळे त्या दुकान धारकांना दिलासा मिळाला आहे. परंतु सलून दुकान धारकांवर उपासमारीची वेळ आली असून इतर दुकान धारकांप्रमाणे सलून चालकांना सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत दुकाने चालू ठेवण्याची परवानगी महाराष्ट्र शासनाकडून मिळवून द्या अशी विनंती रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांना रायगड जिल्हा नाभिक तरुण संघाच्या वतीने रोहा तालुका अध्यक्ष प्रविण पवार यांनी केली आहे.

दरम्यान मागील वर्षीच्या लॉकडाऊन दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात खासदार तटकरे यांच्या माध्यमातून प्रथम रायगड जिल्ह्यातील सलून दुकाने चालू करण्यात आली होती तरी यावर्षी देखील याबाबत खासदार तटकरे यांनी लक्ष घालावे अशीही मागणी जिल्हा नाभिक संघाने केली आहे.

नाभिक तरुण संघांचे रोहा तालुका अध्यक्ष प्रविण पवार यांनी आपल्या निवेदनात की, महाराष्ट्र शासनाने राज्यातील इतर घटकांना लॉकडाऊनच्या कालावधीत सवलत व आर्थिक मदत जाहीर केली असून सलून चालकांवर अन्यायच केला आहे. या लॉकडाऊनच्या कालावधीत सलून चालकांची अवस्था फारच बिकट झाली असून त्यांचा स्वतःचा व्यवसाय असूनही त्याच्यावर भीक मागण्याची वेळ आली आहे. ना सरकारी मदत ना सरकारची सहानभूती त्यामुळे दुकानाचे भाडे आणि कुटुंबाची उदरनिर्वाह कसा करायचा अशा दृष्टचक्रात सलून व्यावसायिक सापडला आहे.

मागील लॉकडाऊनच्या कालावधीत खासदार सुनिल तटकरे, पालकमंत्री ना. आदितीताई तटकरे व आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी रायगड जिल्ह्यातील सलून दुकाने चालू करण्यासाठी मोलाची मदत करून नाभिक समाज बांधवाना दिलासा दिला होता आताही नाभिक समाज बांधवांची तटकरे कुटुंबीयांकडूनच अपेक्षा असून त्यांच्या माध्यमातून लवकरच सलून दुकाने चालू करण्यात येतील व या दृष्टचक्रातून खासदार तटकरे साहेबच बाहेर काढतील असा विश्वास देखील प्रविण पवार यांनी व्यक्त केला आहे. प्रविण पवार पुढे म्हणतात की, समाजाचे आधारस्तंभ भाई टके व जिल्हाध्यक्ष दिनेश मोरे यांची वेळोवेळी समाज बांधवांना मार्गदर्शन मिळत असते असेही शेवटी नाभिक तरुण संघांचे रोहा तालुका अध्यक्ष प्रविण पवार यांनी सांगितले.

फक्त्त केस कापण्याची परवानगी द्यावी
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने सलून चालकांना दाढी करण्यास परवानगी देऊ नये परंतु फक्त केस कापण्याच्या अटीवर सलून दुकाने चालू करण्याची परवानगी मिळवून द्यावी अशी मागणी रायगड जिल्हा नाभिक तरुण संघाच्या वतीने खासदार सुनिल तटकरे यांच्याकडे करण्यात आली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.