सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे ।
वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीत कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. कोरोनावर उपचार करणा-या रुग्णालयांसमोर बेड शिल्लक नसून रेमडिसीवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असल्याने कोरोनाला रोखण्यासाठी रसायनी परिसरातील मोहोपाडा नविन पोसरी,रिस ,चांभार्ली या बाजारपेठा शुक्रवार दि.30 ते 2 मेपर्यंत पुर्णंता बंद करून परिसरात जनता कर्फ्यु लावण्यात आला आहे.
राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली असताना नागरिक तरीदेखील अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली मुक्तसंचार करताना दिसत आहेत. यामुळेच रुग्ण संख्या वाढत असल्याचे दिसून येते.नागरिकांचा हा बिनधास्तपणा त्यांच्या आरोग्यावर बेतू शकतो.याचे कोणालाही भान नसल्याने मोहोपाडा बाजारपेठेत सकाळी अकरा वाजेपर्यंत तुफान गर्दी होत आहे. यामुळे पोलिस यंत्रणेलाही अधिक त्रास सहन करावा लागत आहे.
रसायनी परीसरातील वासांबे मोहोपाडा जिल्हा परिषद हद्दीत कोरोनाने पहिल्या लाटेपासूनच आपली दहशत निर्माण केली होती.त्यापेक्षा दुसऱ्या लाटेत वासांबे मोहोपाडा परीसरात कोरोना रुग्णसंख्या लक्षणीय आहे.वासांबे मोहोपाडा जिल्हा परिषद हद्दीत सध्या 302 सक्रीय रुग्ण असून गुरुवारपर्यंत एकूण रुग्ण संख्या 887 झाली आहे.वासांबे मोहोपाडा हद्दीत एकूण 41जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून 554 जणांनी कोरोनावर मात केली आहे.कोरोनाला परिसरातून हद्दपार करण्यासाठी वासांबे मोहोपाडा परीसरातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळ, ग्रामपंचायत व व्यापारी असोसिएशन, पत्रकार, स्वच्छता कमिटी यांनी नविन पोसरी हनुमान मंदीरात चर्चा बैठक घेतली होती.
यावेळी काही पदाधिकाऱ्यांनी तसेच पत्रकार यांनी जनता कर्फ्यु लावावा अशी मागणी केली होती.यावर दुसऱ्या दिवशी पुन्हा मोहोपाडा शिवाजी चौकात चर्चा करून सर्वांनुमते ठरविण्यात आले. वासांबे मोहोपाडा परिसरात तीन दिवसांचा कडक जनता कर्फ्यु लावला असून तो शुक्रवार दि.30 एप्रिल ते 02 मे पर्यंत राहणार आहे.याबाबत गुरुवारी वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या वतीने स्पिकर लावून परीसरात जनता कर्फ्युचे आवाहन करण्यात आले.








Be First to Comment