कोरोनाच्या काळात हिंदु जनजागृती समितीच्या ‘ऑनलाईन बलोपासनावर्गा’तून युवकांनी घेतली प्रेरणा !
सिटी बेल । गोवे-कोलाड । विश्वास निकम ।
गेल्या वर्षी कोरोनामुळे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले. यंदाही कोरोनाच्या उद्रेकामुळे समाजात भीतीदायक वातावरण आहे. अशा परिस्थितीत आपल्या देशाचे भविष्य असलेले युवक-युवती समाजाला दिशा देऊ शकतात. सध्याच्या विदारक परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सुदृढ शरीर, सक्षम मनोबल आणि ईश्वरी अधिष्ठान यांची आवश्यकता आहे. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रायगड, ठाणे, पालघर आणि मुंबई जिल्ह्यांतील युवक-युवतींसाठी ‘बलोपासना सप्ताहा’ अंतर्गत श्रीरामनवमीपासून ते हनुमान जयंतीपर्यंत प्रतिदिन सकाळी 6 ते 7 या वेळेत ’ऑनलाईन बलोपासना शौर्य वर्ग’ घेण्यात येत आहेत.
या वर्गातून प्रेरणा घेऊन सहभागी झालेल्या युवक-युवतींनी बलोपासनेचा संकल्प केला आहे. या वर्गातून शारीरिक प्रशिक्षणासह प्रभु श्रीराम आणि श्री मारुति यांचा सामूहिक नामजप घेण्यात आला.
महाराष्ट्रात बलोपासना रुजवण्यासाठी समर्थ रामदासस्वामींनी हनुमंताच्या मूर्तींची 11 ठिकाणी स्थापना केली आणि हिंदूंमध्ये ‘हिंदवी स्वराज्या’ च्या स्थापनेचे स्फुल्लिंग चेतवले. हनुमंताने त्रेतायुगात रावणाविरुद्धच्या युद्धात प्रभु श्रीरामास सहकार्य केले, तर द्वापारयुगात महाभारताच्या युद्धात तो कृष्णार्जुनाच्या रथावर विराजमान झाला होता. राष्ट्र आणि धर्मरक्षणासाठी हनुमंताचा आशीर्वाद घेण्यासाठी बलोपासना करणे आवश्यक आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एखाद्या ठिकाणी प्रत्यक्ष एकत्र येऊन वर्ग घेणे शक्य नसल्याने ‘ऑनलाईन’ पद्धतीने अशा स्वरूपाचे वर्ग युवकांसाठी सुरु राहतील, असे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कळविण्यात आले आहे.
याविषयी अधिक माहितीसाठी या 8080208958 क्रमांकावर संपर्क करू शकता. युवक वर्गासह समाजातील सर्व वयोगटातील हिंदु बांधवांसाठी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने 27 एप्रिल या दिवशी ‘ऑनलाईन हनुमान जयंती उत्सव’ घेण्यात आला. या कार्यक्रमात हनुमंताला सामूहिक प्रार्थना, नामजप, आरती आणि स्तोत्रपठण करण्यात आले. यावेळी जोडलेल्या शेकडो भाविकांना मार्गदर्शन करताना हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनिल घनवट यांनी हनुमंताप्रमाणे भक्ति करून राष्ट्र आणि धर्मावरील आघात रोखण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमासोबतच श्रीरामनवमी ते हनुमान जयंतीच्या कालावधीत रायगड जिल्ह्यातील भाविक आणि जिज्ञासू यांच्यासाठी घेण्यात आलेल्या 26 ‘ऑनलाईन’ व्याख्यानांतून प्रभु श्रीराम आणि श्री मारुति यांच्या उपासनेमागील शास्त्र सांगण्यात आले, तसेच यावेळी भाविकांसाठी स्तोत्रपठणासह सामूहिक नामजपही घेण्यात आला. समितीच्या या सर्व उपक्रमांचा 900 हून अधिक भाविकांनी लाभ घेतला.
कोरोनाच्या या विदारक काळात या उपक्रमांतून अनेकांनी खूप प्रसन्न आणि उत्साहवर्धक वाटल्याचे तसेच मन स्थिर होण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे नमूद केले.
Be First to Comment