सिटी बेल । कर्जत । संजय गायकवाड ।
0’2019 साली कर्जत नगरपरिषदेची निवडणूक झाली. त्यावेळी महाराष्ट्र नव निर्माण सेनेने राष्ट्रवादी काँगेसला पाठिंबा दिला होता. त्यावेळी आपल्या वाट्यात येणारा पहिला नगरसेवक मनसेचा असेल असा शब्द दिला होता. तो आम्ही पाळलाच शिवाय दोन वर्षांनंतर त्या नगरसेवकाने राजीनामा दिला तरी सुद्धा पुन्हा स्वीकृत मनसेचाच नगरसेवक निवडून दिला. आम्ही शब्दाला पक्के आहोत याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे.’ असे स्पष्ट प्रतिपादन माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँगेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांनी केले.
कर्जत नगरपरिषदेचे स्वीकृत नगरसेवक धंनजय दुर्गे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर मनसेचे हेमंत सूर्याजी ठाणगे यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संयुक्त पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, नगरपरिषदेचे विरोधी पक्ष नेते शरद लाड, नवनिर्वाचित नगरसेवक हेमंत ठाणगे, मनसे शहर अध्यक्ष समीर चव्हाण, माजी नगराध्यक्ष राजेश लाड आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
लाड पुढे म्हणाले, ‘निवडणुकी पूर्वी आमची आघाडी झाली. ती अजूनही टिकून आहे. निवडणुकीत आमची सत्ता आली नाही. मात्र तरीही जे ठरले ते ठरले. जरी मनसे चे स्वीकृत नगरसेवक दुर्गे यांनी राजीनामा दिला आणि पुन्हा नगरसेवक निवडून देण्याची वेळ आली. तेंव्हा सत्ताधाऱ्यांनी आपला उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविला नाही. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात ही निवडणूक झाली.त्याबद्दल त्यांचेही आभार.’
मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी, ‘राजकारणात सत्ता मिळाली की शब्द पाळत नाहीत. हे आपण पाहत आलो आहोत. काही जण निवडून येतात परंतु आपल्याच कार्यकर्त्याला ते नंतर विचारत नाहीत. राजकारणात शब्द पाळणारा माणूस म्हणून जिल्ह्यात सुरेश लाड यांचे नाव अग्रेसर आहे. त्यांनी दिलेला शब्द पाळला म्हणूनच आमच्या पक्षाचा नगरसेवक पुन्हा नगरपरिषदे मध्ये विराजमान झाला असे स्पष्ट केले. त्यानंतर नवनिर्वाचित नगरसेवक हेमंत ठाणगे यांचा सत्कार करण्यात आला.








Be First to Comment