Press "Enter" to skip to content

कर्जत नगरपरिषदेच्या स्विकृत नगरसेवकपदी कोणाची वर्णी ?

सिटी बेल । कर्जत । संजय गायकवाड ।

कर्जत नगरपरिषदेमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्विकृत नगरसेवक धनंजय नंदकिशोर दुर्गे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने उद्या दि.27 एप्रिल रोजी होणाऱ्या निवडीत त्यांच्या जागी स्विकृत नगरसेवक म्हणून कोणाची वर्णी लागणार याकडे कर्जतकरांचे लक्ष लागले आहे.

कर्जत नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया 28 जानेवारी 2019 रोजी पूर्ण झाली होती. थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महायुतीच्या सुवर्णा जोशी निवडून आल्या आहेत. 27 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या नगरपरिषदेच्या पहिल्या विशेष सभेत उपनगराध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे अशोक ओसवाल यांची वर्णी लागली होती तर स्वीकृत नगरसेवक पदी शिवसेनेचे संकेत भासे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे धनंजय दुर्गे यांची वर्णी लागली होती.

जानेवारी मध्ये पार पडलेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेना -भाजपा-आरपीआय महायुतीच्या थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुवर्णा जोशी विजयी झाल्या होत्या. महायुतीचे दहा नगरसेवक निवडून आले आहेत. तर राष्ट्रवादी कॉग्रेस मनसे-शिवराय भीमराय क्रांती संघटना महा आघाडीला आठ जागा मिळाल्या आहेत. दहा वर्ष राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या ताब्यात असलेली सत्ता मिळवण्यात महायुतीला यश आले.

नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांच्या अध्यक्षतेखाली दि.27 फेब्रुवारी रोजी उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन केले होते. सत्तेत बसलेली महायुती मध्ये शिवसेना – भाजपा -आरपीआय हे तीन पक्ष आहेत.पहिले उपनगराध्यक्ष पदाचा मान भाजपचे अशोक ओसवाल यांना मिळाला होता. स्वीकृत नगरसेवक म्हणून शिवसेनेनेचे संकेत भासे यांची वर्णी लागली होती.

राष्ट्रवादी- मनसे-शिवराय भीमराय क्रांती संघटना महा आघाडीला आठ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे त्यांचा एक नगरसेवक स्वीकृत होणार होता,स्वीकृत नगरसेवक पदाची पहिली संधी मनसेच्या धनंजय दुर्गे यांना मिळाली होती.

राष्ट्रवादी- मनसे-शिवराय भीमराय क्रांती संघटना यांच्यात ठरल्याप्रमाणे मनसेचे स्विकृत नगरसेवक धनंजय दुर्गे यांनी 12 एप्रिल 2021 रोजी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाधिकारी यांच्याकडे दिला. दुर्गे यांनी 2 वर्ष स्विकृत नगरसेवक म्हणून काम केले. आता त्यांच्या जागी कोणत्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची स्विकृत नगरसेवक म्हणून वर्णी लागते याकडे कर्जतकरांचे लक्ष लागले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.