सिटी बेल । मुकुंद रांजाणे । माथेरान ।
पहिल्या लॉक डाऊन काळात माथेरान मधील नागरिकांना सरसकट जीवनावश्यक वस्तूंच्या वाटपासाठी अनेक दानशूर हात पुढे सरसावले होते. त्यावेळी येथील वे साईड इन हॉटेलचे मालक अब्बास अली हुसेन पीरभोय यांनी सढळ हाताने पाचशे पेक्षाही अधिक जीवनावश्यक वस्तूंचे किट्सचे गरजवंतांना वाटप केले होते. तदनंतर आता कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता हे दुसरे लॉक डाऊन शासनाकडून जाहीर करण्यात आल्यामुळे हातावर पोट भरणाऱ्या श्रमिकांसाठी हातगाडी ओढणाऱ्या लोकांना सकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत मोफत अल्पोपहाराची सोय उपलब्ध केली आहे.तर नुकताच रमजान हा मुस्लीम बांधवांचा सण ( रोजा) सुरू झाल्यामुळे अनेकांना फराळाचे साहित्याचे वाटप सुध्दा केले आहे.
त्याचप्रमाणे लवकरच गावातील गरजवंत निराधार जेष्ठांना घरपोच एकवेळचा जेवणाचा डबा देण्यात येणार आहे.तसेच गावातील ठराविक भागातील निराधार विधवा महिलांना जीवनावश्यक वस्तूंचे किट्स दर महिन्याला देण्यात येणार आहे.
अब्बास अली हुसेन पीरभोय यांच्या मातोश्रींचे (फिझा हुसेन पीरभोय) नुकताच निधन झाले आहे त्यामुळे आपल्या आईच्या स्मरणार्थ आपण सढळ हस्ते गरजवंतांना मदतीचा हातभार लावत आहोत. यापूर्वी देखील अब्बास अली हुसेन पीरभोय यांचे वडील हुसेन आदमजी पीरभोय हे दरवर्षी पावसाळ्यात शालेय विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप करत होते त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन दानशूरता त्यांनी सुध्दा अंगिकारली आहे.



लॉक डाऊन नंतर लवकरच शाळा सुरू झाल्यानंतर गोरगरीब विद्यार्थ्यांना मोफत शिकवणीचा वर्ग सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सध्यातरी हॉटेल व्यवसाय लॉक डाऊन मुळे पूर्णतः डबघाईला आलेला असताना देखील एक सामाजिक बांधिलकी आणि सर्वसामान्य लोकांना लॉक डाऊन काळात सोसावी लागत असलेली महागाईची झळ यातूनच काहीतरी मदत करावी या उदात्त हेतूने आपण हे कार्य करत आहोत असेही
अब्बास अली हुसेन पीरभोय यांनी शेवटी स्पष्ट केले. या त्यांच्या दातृत्वा बद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.या कामात त्यांना वे साईड इन हॉटेल मधील कर्मचारी वर्ग सुध्दा सहकार्य करीत आहेत.








Be First to Comment