Press "Enter" to skip to content

“साई सहारा प्रतिष्ठान ” च्या अत्याधुनिक रुग्णवाहिकेचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण

कल्पेश ठाकूरच्या निस्वार्थी समाजसेवेचा आदर्श जिल्ह्यातील तरुणांनी घ्यावा : जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचे आवाहन

सिटी बेल । पेण । सुनिल ठाकुर ।

मुंबई – गोवा महामार्गावर मागील 16 वर्षांपासून अपघातग्रस्तांची विनामूल्य मदत करणाऱ्या कल्पेश ठाकूर यांच्या निस्वार्थी समाजसेवेचा आदर्श रायगड जिल्ह्यातील सर्व तरुणांनी घ्यावा असे आवाहन रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी पेण येथे साई सहारा प्रतिष्ठानच्या अत्याधुनिक रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्यात बोलताना केले.

देशात व महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी कल्पेश ठाकूर यांच्या साई सहारा प्रतिष्ठान मार्फत घेण्यात आलेल्या नवीन अत्याधुनिक रुग्णवाहिकेचे लोकार्पण जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते आज ( सोमवारी दि.19) रोजी संपन्न झाले.

मुंबई-गोवा महामार्गावरील आंबिवली फाटा,पेण येथील हॉटेल साई सहारा येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमास पेणचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, पेण उपविभागीय पोलिस अधिकारी विभा चव्हाण, तहसीलदार डॉ.अरुणा जाधव, वरिष्ठ माजी पोलीस निरीक्षक आय.एस.पाटील, पेण पोलीस निरीक्षक गौरीप्रसाद हिरेमठ, दादर सागरी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद पाटील, उपनिरीक्षक के.आर.भौड, डॉक्टर किशोर देशमुख, महाराष्ट्र विद्युत मंडळाचे अभियंता संजय ठाकूर आदी उपस्थित होते.

या उद्घाटन प्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी निधी चौधरी म्हणाल्या कि, मी पेण प्रांताधिकारी असताना कल्पेश ठाकूर करत असलेल्या कार्याची माहिती होती. मुंबई-गोवा महामार्गावर होणाऱ्या अपघातग्रस्तांसाठी त्याचे कार्य अनेक वर्षे सुरू आहे. मुख्य म्हणजे त्यांनी आपल्या कार्यात मागील सोळा वर्षांपासून सातत्य ठेवले आहे. हे खूपच महत्त्वाचे असून त्यांचे हे कार्य निश्चितच गौरवास्पद आहे. ज्या प्रकारे अनाथांची माय सिंधुताई सपकाळ ह्या कोणत्याही फळाची अपेक्षा न करता निस्वार्थी पणे कार्य करत आहेत, त्यांना शासनाने पद्मश्री किताब देऊन गौरविले त्याचप्रकारे कल्पेश ठाकूर यांनी कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता निस्वार्थी कार्य करत राहावे. तसेच मी पेण प्रांताधिकारी म्हणून त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. आज जिल्हाधिकारी म्हणून पुन्हा गौरव करत असून पुढील काळात विभागीय आयुक्त म्हणून गौरव करण्याचे भाग्य लाभेल अशी अपेक्षा जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी यावेळी व्यक्त केली.

आजची कोरोना सारखी भयंकर लाट संपूर्ण जगात तसेच देशात व राज्यात निर्माण झाली आहे. या काळात रुग्णांची वाढती संख्या पाहता जिल्ह्यातील तरुणांनी कल्पेश ठाकूर यांच्या सारख्या मदतीसाठी पुढे येणे गरजेचे आहे. कोरोना पासून बचाव करण्यासाठी मास्क लावणे, वारंवार हात धुणे व सोशल डिस्टंसिंग या त्रिसूत्री चे पालन जनतेने करावे असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

कोरोना रोगावर प्रतिबंधक लस देण्याचे कार्य जिल्ह्यात सर्वत्र सुरू आहे. शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून जनतेने दोन्ही वेळ देण्यात येणारी ही लस घ्यावी असे देखील त्यांनी यावेळी म्हटले. तसेच बरे वाटत नसल्यास नागरिकांनी वेळोवेळी टेस्ट करुन घेण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.

राज्यात कोरोना रोगावर उपचार करताना देण्यात येणाऱ्या रेमडेसिविर औषधाची मागणी वाढल्याने तुटवडा जाणवत आहे. मात्र ज्या रुग्णाला खरोखरच या औषधाची गरज आहे, त्यालाच डॉक्टरांनी ते देणे गरजेचे आहे असे म्हटले. अत्यावश्यक रुग्णांना या औषधाची गरज असतांना सरसकट सर्वच रुग्णांना हे औषध देणे चुकीचे आहे, असेही आवाहन त्यांनी जिल्ह्यातील डॉक्टरांना केले. पेण मधील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता पेण मध्ये 200 खाटांचे हॉस्पिटल लवकरात लवकर उभे करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी यावेळी दिली.

कल्पेश ठाकूर यांच्या निस्वार्थी सेवेचा गौरव उपस्थित सर्व मान्यवरांनी यावेळी केला. कोरोना काळातील शासकीय नियमांचे पालन करून करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायक संतोष पाटील तरणखोपकर यांनी केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.