सिटी बेल । धाटाव । शशिकांत मोरे ।
सबंध देशासह राज्यात कोरोणाच्या संक्रमणामुळे कोरोनाची साखळी तोडण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने १ मे पर्यंत लॉक डाऊन जाहीर केला आहे.कोरोनाचे वाढते थैमान लक्षात घेवून रोहा तालुक्यातील तळाघर मधील महादेव मंदिर येथील महादेवाची पारंपारिक यात्रा रद्द करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे.मात्र सतत दोन वर्ष ही यात्रा रद्द झाल्याने भाविकांचा चांगलाच हिरमोड झाला आहे.
रोहा तालुक्यात तलाघर येथे रामनवमी निमित्त दोन दिवस महादेवाची पारंपारिक यात्रा भरते.दरम्यान या प्रसिद्ध यात्रेत पहिल्या दिवशी महादेवाचे रात्री १२ वाजता लग्न लावले जाते.विविध गावातून मानाच्या काठ्या याठिकाणी खालु बाज्या आणि सनईच्या वाद्यात वाजत गाजत नाचवित आणल्या जातात.अठरा पगड जातीतील समाज बांधव,भाविक या यात्रेला दुरहुन हजेरी लावतात.चैत्र महिन्यातील ही यात्रा २० व २१ एप्रिल रोजी होती.मात्र रायगडात विशेषतः रोह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसागणिक वाढत असल्याने राज्य शासनाने कडक निर्बंध जारी केल्याने गर्दी होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाने सर्व सार्वजनिक कार्यक्रम यात्रा रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.
सदर आदेशाचे पालन आणि कोरोनाचे संक्रमन लक्षात घेता तळाघर महादेव मंदिर येथील महादेवाची यात्रा रद्द करण्यात आली असून या काळात भाविकांनी शिव शंकराच्या दर्शनासाठी येऊ नये असे आवाहन धाटाव कुणबी समाजाचे सचिव सतीश भगत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे आवाहन केले आहे.
Be First to Comment