Press "Enter" to skip to content

रात्र

रात्र

रात्रीशी आजकाल मी बोलतच नाही
मनातल्या व्यथा तिला सांगतच नाही
पांघरून घेऊन तोंडावर झोपी जातो
मनसोक्त गप्पा तिच्याशी मारतच नाही

कळत नाही मला का पळतो मी तिच्या पासून
असे काय आहे जे मी लपवतोय तिच्या पासून
सर्वज्ञ आहे ती, सगळं जरी माहिती आहे तिला
आज काल तिला कुशीत घेऊन मी बिलगत नाही

धुरकटलेला कंदील आणि मिणमिणता दिवा
अंधारलेली रात आणि वर चांदण्याचा सडा
थंडी वाजली तरी  शेकोटीला नाकारतो मी
आज काल उगाच रात्र मी जागवत नाही

जुन्या आठवणींनीची पोतडी ही उघडते
निसटलेल्या क्षणांची कुंडली ती मांडते
हरवलेल्या नात्यांना आता विसरलो मी
पुन्हा पुन्हा त्या दुःखावर मी रडतच नाही

स्वतः शीच संवाद मी आता साधतच नाही
आरशात स्वतःचाच चेहरा पाहातच नाही
झालेल्या चुकांची मीच माफी मागतो आता
आज काल स्वतःशी पण मी भांडतच नाही

कोणावर आता मी चिडत देखील नाही
कोणाच्या कटू बोलण्याने दुखावत नाही
आशा अपेक्षा गुंडाळून ठेवल्या मी साऱ्या
स्वप्नाना जवळपास मी फिरकू देतच नाही

माझा परका असा भेद राहिला न आता
सुख दुःखाचा आवेग न येतो मज आता
आज मी पोचलो त्या ठिकाणी, की जिथे
स्वतःचेच असणे मजला कळतच नाही

शेखर अंबेकर, आदई

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.