सिटी बेल । उरण । वैशाली कडू ।
उरण तालुक्यामधील फुंडे गावानजीक असणारा सिडकोचा पूल काल बुधवारी संध्याकाळी कोसळू पुलावरून जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराला गंभीर दुखापत झाली होती. या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, या पुलाचा स्ट्रक्चरल ऑडिट करून संबंधित दोषींवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा तसेच मयताच्या नातेवाईकांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
सिडको उरण, बेलापूर पट्ट्यामध्ये तिसऱ्या मुंबईची उभारणी करत आहे. यासाठी सिडकोच्या माध्यमातून मोठ मोठी विकासकामे सुरू आहेत. या विकास कामांच्या माध्यमातून येथील खाडी भागामध्ये रस्ते जोडण्यासाठे अनेक छोटे मोठे पूल बांधण्यात आले आहेत. अशाच प्रकारे काही वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला फंडे गावानाजीकचा चार पदरी पूल अचानक कोसळून अपघात झाला. या अपघातामध्ये पुलावरून प्रवास करणारा दीपक कासुकर रा. डाऊरनगर हा पडणाऱ्या पुलासोबत आपल्या दुचाकीसोबत खाली पडल्याने गंभीर जखमी झाला होता. तात्काळ या तरुणाला स्थानिकांच्या मदतीने उपचारासाठी रुग्णालयामध्ये हलवण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान या तरुणाने आपला जीव गमावला आहे.
दीपक कासुकर याच्या जाण्याने त्याचे कुटुंब उघड्यावर पडले आहे. त्याच्या पश्चात तीन वर्षांची चिमुकली, पत्नी, आई वडील व भाऊ असा परिवार आहे. तरी या अपघातात दीपक कासुकरचा नाहक बळी गेला आहे. तरी त्याच्या कुटूंबाला त्वरित नुकसान भरपाई मिळावी अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
काही वर्षांपूर्वीच बांधण्यात आलेल्या या पुलावरून क्षमतेने वाहतूक होत नसतानाही पूल कोसळला असल्याने, संबंधित ठेकेदारांची चौकशी व्हावी आणि पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट व्हावे, यामधून दोषी असणारे अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घनश्याम कडू यांनी केली आहे.








Be First to Comment