यात्रा पालख्यांवर यंदाही कोरोना इफेक्ट ! घरी रहा सुरक्षित रहा !!
सिटी बेल । उरण । अजित पाटील ।
एप्रिल मे महिना म्हणजे आगरी – कोळी समाजात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या यात्रा पालख्यांचा हंगाम ! याच हंगामात येणारी आई एकविरा देवीची सर्वात मोठी यात्रा कार्ल्यात भरते ज्याला रायगड आणि ठाणे जिल्ह्यासह मुंबापुरीतूनही आगरी कोळी समाज तुफान गर्दी करीत असतो ! पायरी एक एक चरतांना आई नाव तुझं ओठान…. नाय सूद मला कनाची भरलय रूप तुझं डोळ्यांन !! आयलो पायाशी आई तुझे घे मना पदरानं गं … घे मना पदरानं !! पालखीला नाचीन गुलाल उरवून चैताचे महिन्यान गं चैताचे महिन्यान !! अशी गाणी वाजता गाजत भक्तगण एकविरा देवीच्या भव्य अंगणात दाखल होत असतात . मात्र मेल्या कोरोनाची साथ दिवसागणिक पुन्हा एकदा मागच्या वर्षी पेक्षाही मोठ्या प्रमाणात रौद्र रूप धारण करू लागली असल्याने यावर्षी ही भक्तगणांना मात्र यात्रा पालख्यांच्या आनंदाला मुकावे लागण्याची दाट शक्यता दिसत आहे !
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊनचा निर्णय आजच्या दिवसापर्यंत तरी लागू झालेला नसला तरीही तज्ञाच्या मते मात्र कडक निर्बंधाशिवाय कोणताही पर्याय दिसत नाही त्यामुळेच यावर्षी ही गावोगावच्या यात्रा पालख्यांवर मात्र कोरोना इफेक्ट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे . या बहुतांशी यात्रा पालख्यांच्या निमित्ताने केवळ गर्दी टाळून आणि सामाजिक अंतर पाळून केवळ ठराविक मंडळींनाच धार्मिक विधी करण्याच्या परवानग्या मिळू शकतील असे सध्य स्थितीतून दिसत असल्याने यावर्षीच्या यात्रा पालख्या ही सुन्या सुन्याच जाण्याची शक्यता बळावली आहे.
रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील यात्रा पालख्या हा येथील विशेषतः आगरी कोळी समाजाच्या भावनेचा आणि श्रद्धेचा विषय आहे . यात्रा पालख्यांच्या निमित्ताने अगदी दरवर्षी केली जाणारी घराची रंगरंगोटी असो किंवा पाहुण्यांच्या पाहुणचारात कोणतीही कमतरता पाडायला नको म्हणून सुमारे महिनाभरा आधीपासून सुरू होणारी लगबग हे सर्वच या गावोगावी पाहायला मिळत असते कार्ल्याच्या एकविरा देवीच्या यात्रेसाठी दरवर्षी होणारी गर्दीने तर अनेक उच्चाक मोडले आहेत. तोच उत्साह ठाणे जिल्ह्यातल्या तिसगावच्या यात्रेच्या निमित्ताने ही पाहायला मिळतो. उरण तालुक्यातील जसखार गावची रत्नेश्वरी आईची जत्रा देखील गेल्या काही वर्षात गर्दीला मोठ्या प्रमाणात खेचत असल्याचे पाहायला मिळत आहे.
यंदा उरण तालुक्यातील या यात्रा पुढील आठवड्या पासून सुरू होत आहेत . त्यामध्ये सर्वात आधी फुंडे गावातील श्रीरामाची यात्रा 21 एप्रिल रोजी आहे मात्र यात्रेला आजच्या तारखेपर्यंत तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परवानगी नसल्याची माहिती मिळत आहे. 27 एप्रिलला गावोगावच्या देवळामध्ये हनुमान जयंत्या साजऱ्या होणार आहेत. मात्र त्या देखील केवळ धार्मिक विधी अत्यंत कमी लोकांमध्ये साजरा करण्याचे निर्देश मिळण्याची शक्यता आहे .
त्यानंतर 3 ते 5 मे दरम्यान जसखारच्या रत्नेश्वरीची यात्रा येत आहे मात्र ही यात्रा देखील गेल्यावर्षी प्रमाणेच या वर्षी ही कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर भरवली जाण्याची किंवा यात्रेला परवानगी मिळण्याची आशा धूसरच झाल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर उरणच्या पुर्व भागातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळखली जाणारी कोप्रोलीची यात्रा 11 मी रोजी येत आहे मात्र या यात्रेवर सुद्धा कोरोनाचे सावट राहण्याची शक्यता सध्याच्या एकूणच परिस्थिती वरून दिसून येत आहे .
प्रशासन आणि पोलिसांकडून मिळणाऱ्या सूचना पाळण्याकडेच नागरिकांचा सर्वाधिक कल असल्याचे दिसत असल्याने यावर्षीही यात्रा पालख्या गेल्यावर्षी सारख्याच केवळ पूजा अर्चा या पुरत्याच मर्यादित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अर्थातच प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सूचना या लोकहिताच्याच असल्याने त्या तंतोतंत पाळून महामारीला हरवू या असे आवाहन गावोगावच्या यात्रा पालखी आयोजकांकडून केल्या जाऊ शकतात !
त्यामुळे यावर्षीच्या यात्रा पालखीत नाचून ती साजरी करण्याचे आकारले असाल तर जरा थांबा ! बाहेर कोरोना आहे याचे भान ठेवा असे आवाहन या निमित्ताने आम्ही वाचकांना करीत आहोत . घरी रहा सुरक्षित रहा कोरोनाची वाढती साखळी तोडायला प्रशासनाला मदत करू या !!
Be First to Comment