Press "Enter" to skip to content

चिरनेरच्या जंगलात कसायांची रक्ताची होळी : जनावरांची खुलेआम कत्तल

सिटी बेल । उरण । घनश्याम कडू ।

गावागावांत होळीचे रंग उधळत असताना चिरनेरचा जंगलात अंधाऱ्या रात्री कसायांकडून रक्ताने होळी खेळली गेली आहे.चिरनेरच्या जंगलातीलबापूजी देव परिसरात रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत कसायांनी गाईंची निर्दयपणे कत्तल करून त्यांचे मांस घेऊन ते पसार झाले आहेत.असे प्रकार या जंगलात नेहमी घडत असल्याने जनतेत संतापाची लाट निर्माण झाली आहे.

१९३० सालच्या जंगल सत्याग्रहाचा वारसा असणाऱ्या चिरनेरगावाच्या पूर्वेला विस्तीर्ण जंगल पसरले आहे.विविध प्रकारची जैव विविधता असणाऱ्या या जंगलात शिकाऱ्यांबरोबरच जंगलात असणाऱ्या मोकाट गुरांना फास टाकून पकडून त्यांची कत्तल करणाऱ्या कसायांचा टोळीचाही वावर नेहमी असतो.जंगलातील मोकाट गाई बैलांना झुडपात लावलेल्या फासात पकडून त्यांना त्यांनी आणलेल्या वाहनांमधून हे कसाई रात्रीच्या अंधारात पळवून नेतात.त्यासाठी त्यांना चिरनेर गावातील काही गुरे चोर पैशाच्या आमिषाने मदत करतात.

काल रात्री सर्व गावागावात होळीचे रंग भरले जात असताना चिरनेरच्या जंगलात असणाऱ्या बापूजी देव मंदिर रस्त्याच्या बाजूलाच रात्रीच्या अंधारात कसायांनी दोन गुरांची निर्दयपणे कत्तल करून रक्ताने होळी खेळली आहे.विशेष म्हणजे कसलीही भीती न बाळगता त्यांनी या गुरांची विल्हेवाट लावून त्यांचे मांस घेऊन ते पसार झाले आहेत.ज्याठिकाणी गुरांचा बळी घेतला आहे तेथे रक्ताचे थारोळे साचले असून पोटातील घाणतेथेच टाकून देण्यात आली आहे.

चिरनेर परिसरात बहुसंख्य आगरी समाजाची वस्ती असताना हे कसाई बिनधास्त जंगलात घुसून गुरांची तिथेच बिनदिक्कत कत्तल करीत असल्याने त्यांना गावातून सहकार्य करणाऱ्या हिंदू कसायांचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणेने जागरूकता दाखवावी अशी संतप्त मागणी जनतेतून होत आहे. चिरनेर गावात असणाऱ्या गुरे चोरांमुळे चिरनेर गावातील पशुधन कमी झाले असून या गुरे चोरांना पायबंद घातला न गेल्याने अनेक पशुपालकांनी महागडी जनावरे या गुरे चोरांनी कसायांना परस्पर विकली आहेत.

आता तर त्यांचे धाडस वाढल्याने रस्त्याकडेला गुरे कापली जात असल्याने उरणची सुरक्षा व्यवस्था गाढ निद्रेत असल्याचे दिसून येत आहे.संशयितांना ताब्यात घेऊन पोलिसांनी चौदावे रत्न दाखविल्यास खरे आरोपी नक्की मिळतील असा विश्वास काही शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.