एक फुल
एक फुल एकदांच फुलतं
सांग ना तरी ते किती खुलतं
गंध , सुगंध सांडतं
वाऱ्यासोबत डोलतं
पानांपानांतूंन बहरतं.
पाकळ्यांतून बोलतं
मोजक्या क्षणांच अस्तित्व
तरी माणसाला आनंद देतं
उन , वारा आनंदानं झेलतं
काट्यांनाही खंबीरपणे पेलतं
परिस्थितीच्या संघर्षात
नेहमीच उभं ठाकतं
कोणी भाव करून जातं
कोणी भाव देऊन जातं
कोणी भाव देऊन घेऊनही जातं
कुणी नुस्तंच कौतुकानं पहातं
कधी गुरूंच्या चरणी येऊन
विनम्र नतमस्तक होतं
देवळातल्या मूर्तीसमोर
वातावरण प्रसन्न करतं
आजीच्या अंबाड्यांचं
किती सौंदर्य वाढवतं
प्रियकर प्रेयसीच्या
प्रेमाची निशाणी बनतं
प्रेमांत साक्षीदार होऊन
प्रीत अजरामर करतं
लहान मुलांच्या हाती
निरागसतेचं प्रतिक होतं
फुलदाणीत ठेवलं की
घराचं घरपण डवरतं
कधी एखाद्या सज्जनाच्या
अभिमानाची प्रौढी मिरवतं
कधी एखाद्या पार्थिव
देहाला गच्च सजवतं
आणि मग यात्रा
सुरू होते पुन्हा एकदा
मातीत मिसळून सृजनांत
बीज नवनिर्मीतीचं
बीज नवनिर्मीतीचं..
संगीता थोरात, नवीन पनवेल .







Be First to Comment