घारापुरी बेटावर सागरी मार्गाने येणाऱ्या होड्या, लॉचेस,मचव्यांनाही सक्तीची बंदी
सिटी बेल लाइव्ह । उरण ।
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यावर्षी ११ मार्च रोजी साजरा होणारा जागतिक किर्तीचा घारापुरी बेटावरील महाशिवरात्रीचा उत्सव शासनाच्या आदेशाने रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे दरवर्षी महाशिवरात्री निमित्ताने घारापुरी बेटावर साजरा होणारा उत्सव रद्द करण्यात आल्याची माहिती सरपंच बळीराम ठाकूर यांनी दिली.
महाशिवरात्री निमित्ताने जागतिक घारापुरी बेटावरील या शिवलिंगाच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखोंच्या संख्येने देशी-विदेशी पर्यटक आणि शिवभक्त येतात. त्यामुळे घारापुरी बेटावरील महाशिवरात्रीला जागतिक महाशिवरात्री म्हणूनही ओळखली जाते.
बेटावर जाण्या-येण्यासाठी गेटवे ऑफ इंडिया,जेएनपीटी,उरण-मोरा,न्हावा बंदरातून होड्या,लॉचेस,मचव्यांची सोय असते. यावर्षी मात्र कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर घारापुरी बेटावर भरविण्यात येणाऱ्या महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यावर शासनाने प्रतिबंध घातले आहेत.
यामुळे गुरुवार दि.११ मार्च रोजी महाशिवरात्री निमित्त गेटवे ऑफ इंडिया,जेएनपीटी,उरण-मोरा,न्हावा बंदरातून घारापुरी बेटावर सागरी मार्गाने येणाऱ्या होड्या, लॉचेस,मचव्यांनाही सक्तीची बंदी घालण्यात आली आहे. शिवभक्त भाविकांनी शासनाने घातलेल्या बंदीचे काटेकोरपणे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन घारापुरी ग्रामपंचायतीचे सरपंच बळीराम ठाकूर यांनी भाविकांना केले आहे.
Be First to Comment