Press "Enter" to skip to content

व्यथा

व्यथा

न सांगावी कधी कोणा , व्यथा आपल्या मनाची
खरी जरी असली तरी , मतं मात्र नाही मांडायची
“तुला काही समजत नाही” असा ऐकून घेऊन , जिभेवरला शब्द , अलगद गिळायचा
कितीही झाला अपमान , तरीही तो पटकन पचवायचा

रांधा वाढा उष्टि काढा , हेच जणू तेव्हा ब्रीद वाक्य होत
मुलाबाळांच्याच भोवती , आयुष्य अडकलेलं होत
कमतरता कशाशीच नव्हती , जे होत त्यात सगळंच भागत होत
मनी विचारांचं काहूर अन डोळ्यात पाणी , यांनीही पोट भरत होत…

आता मात्र पोट भरायाला दोन नाही तर चार हातांची गरज भासते
आयुष्याची गाडी ओढायला माझीही तितकीच मदत लागते
बरोबरीने उभं राहताना मनाला वेगळीच उभारी मिळते
आता मनाची व्यथाही समोरच्याला अलगद कळते

जेवण खाण मुलं बाळ आजही काहीच नाही चुकलं
घर संसार सगळं सांभाळूनही आज जगाला माझं अस्तित्व समजलं
अबला म्हणून जगण राहणं आता खर संपलं
तुला समजत नाही तुला जमत नाही असा आता काहीच नाही उरलं….

सई मराठे, पनवेल

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.