चुकीच्या पद्धतीने मास्क वापरल्यामुळे त्वचारोग व संसर्गजन्य आजारांमध्ये होत आहे वाढ
सिटी बेल लाइव्ह । मुंबई । आरोग्य प्रतिनिधी ।
डिसेंबर २०१९ च्या सुरवातीला चीनमध्ये नवीन कोरोना विषाणू या नवीन आजाराची सुरुवात झाली आणि आता हा आजार शेकडो देशांमध्ये फैलावाला असून यावर कोणत्याही देशाने अजूनही मात केलेली नाही. कोरोना आजाराशी लढ़ण्यासाठी, सुरक्षित अंतर राखणे, वारंवार हात-पाय धुणे व नियमित मास्क लावणे या त्रिसूत्रीचा वापर करणे फार गरजेचे आहे व यामुळे कोरोनाला आपण निदान अटकाव करू शकतो परंतु चुकीच्या पद्धतीने मास्क घालणे, एकच मास्क सलग चार ते पाच दिवस वापरणे, डिस्पोजेबल मास्क परत धुऊन वापरणे, मास्कचा वापर झाल्यावर तो अस्वच्छ ठिकाणी ठेवणे , कुटुंबामध्ये एका व्यक्तीचा मास्क दुसऱ्या व्यक्तीने वापरणे अशा घटना वाढत असून कोरोनासोबतच त्वचारोग व इतर संसर्गजन्य आजारांमध्ये वाढ होत असल्याची निरीक्षण कल्याण पूर्व येथील स्टारसिटी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे करण्यात आले आहे.
याविषयी अधिक माहिती देताना स्टारसिटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक व जेष्ठ फिजिशियन डॉ प्रवीण भुजबळ म्हणाले, ” योग्य पद्धतीने वापर केलेला वैद्यकीय मास्क हा सहा ते आठ तासांपर्यंत प्रभावी असतो. जर या कालावधी दरम्यान तो ओला झाला तर तो तात्काळ दुसरा मास्क वापरणे गरजेचे असते तसे न केल्यास नाकाला तसेच ओठाला ऍलर्जी होण्याचा धोका निर्माण होतो व अशा नवीन केसेस वाढत आहेत. अनेक नागरिक एकच मास्क सातत्याने चार ते पाच दिवस घालतात त्यामुळे धाप लागणे, श्वास कोंडणे तसेच इतर संसर्गजन्य आजार बळावण्याची शक्यता ५० टक्क्यांनी वाढते. मास्कचा वापर करत असताना त्याला हात लावणे टाळा.
मास्क गळ्यात लटकवून ठेऊ नये त्यामुळे तुमच्या गळ्याजवळ जमणारा घाम परत मास्क लावल्यावर नाक व तोंडाद्वारे परत शरीरात जाऊन इन्फेक्शन वाढण्याची शक्यता असते. सध्या गरमीचे दिवस सुरु झाले आहेत त्यामुळे बाहेर काम करणाऱ्या नागरिकांनी किमान सहा तासांनी किंवा ओला झाल्यानंतर मास्क बदलणे गरजेचे आहे. डिस्पोजेबल मास्कचा वापर पुन्हा करू नये कारण त्याची क्षमता एका कालावधीनंतर समाप्त झालेली असते. डिस्पोजेबल मास्कची योग्य विलेव्हाट लावणे पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून गरजेचे आहे. मास्क काढताना त्याच्या दुषित बाह्य भागाला स्पर्श न करण्याची सर्वाधिक काळजी नागरिकांनी घेतली पाहिजे अनेकजण हा वापरलेला मास्क आपल्या शर्टच्या व पॅंटीच्या खिश्यात ठेवतात त्यामुळे मास्कचा बाह्य भागाला असलेले विषाणू आपल्या हाताद्वारे परत आपल्या शरीरात जातात. वापरलेला मास्क संभाव्यतः संक्रमित मानला जातो.
कोरोनाचे रूग्ण त्यांची काळजी घेणारे हॉस्पिटलमधील कर्मचारी तसेच याची घरगुती काळजी घेताना जवळच्या संपर्कात असलेल्या व्यक्तीनी वापरलेले मास्क निर्जंतुकीकरण करावे आणि नंतर जाळून किंवा खड्ड्यात पुरून विल्हेवाट लावणे गरजेचे आहे.”सध्यातरी कोरोनाला हरविण्यासाठी आपल्याकडे मास्क हे एकमेव अस्त्र आहे परंतु याचा योग्य वापर होणे गरजेचे आहे असे मत डॉ. प्रवीण भुजबळ यांनी व्यक्त केले.
दर चार तासांमध्ये ५ ते १० मिनिटांसाठी मास्क ब्रेक घेतल्यास आपली त्वचा निरोगी राहण्यास मदत मिळते. परंतु सार्वजनिक ठिकाणी असताना चेहऱ्यावरील मास्क काढू नये;घरी पोहोचल्या नंतरच मास्क काढणे कोरोना संक्रमण काळात हिताचे ठरेल.आपल्या त्वचेवरील अतिरिक्त तेल, धूळ-मातीचे कण तसंच श्वासोच्छवासाद्वारे बाहेर फेकले जाणारे कण इत्यादी मास्कवर जमा होतात त्यामुळे ज्या नागरिकांना श्वसन विकार तसेच हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी डिस्पोजेबल मास्क वापरणे गरजेचे आहे, अशा नागरिकांनी डिस्पोजेबल मास्क सहा ते आठ तासांनी बदलावे अशी माहिती बोरीवली येथील अपेक्स हॉस्पिटल समूहाचे छातिरोग -फुफ्फुसविकारतज्ञ डॉ. जिग्नेश पटेल यांनी दिली.








Be First to Comment