140 नागरीकांनी करून घेतली तपासणी
सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड ।
कर्जत नगरपरिषद आणि मुंब्रा कौसा येथील काळसेकर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत वैद्यकीय शिबीर आयोजित करण्यात आले होते, यावेळी कर्जत मधील 140 नागरिकांनी आपली वैद्यकीय तपासणी करून घेतली.
नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष सुवर्णा जोशी आणि विद्यमान बॉडीला आज दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झाला, त्यानिमित्त मोफत वैदकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांच्या हस्ते शिबिराचे उद्धाटन करण्यात आले, याप्रसंगी बांधकाम सभापती विवेक दांडेकर, पाणी पुरवठा सभापती बळवंत घुमरे, महिला बालकल्याण सभापती प्राची डेरवणकर, महिला बालकल्याण उपसभापती संचिता पाटील, नगरसेविका ज्योती मेंगाळ, भारती पालकर, सुवर्णा निलधे, विशाखा जिनगरे, पुष्पा दगडे, मधुरा चंदन, वैशाली मोरे, नगरसेवक शरद लाड, राहुल डाळींबकर, सोमनाथ ठोंबरे, धनंजय दुर्गे,उमेश गायकवाड उपस्थित होते.
मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी प्रास्ताविकात लोकप्रतिनिधी खासदार श्रीरंग बारणे,आमदार महेंद्र थोरवे यांचे मार्गदर्शन आणि नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, सर्व सन्माननीय नगरसेवक नगरसेविका यांच्या सहकार्याने कोरोना महामारीत आपण काम करू शकलो या मध्ये सर्वांचा सहभाग महत्वाचा होता, महामारीत इतर विकासाचे काम करताना थोडासा पायबंद बसला मात्र ती जलद गतीने करण्याचा प्रयत्न करू असे सांगितले.
नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी माझे सर्व कर्जतकर बंधू-भगिनींनो तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला हा दिवस बघायला मिळाला दोन वर्षापूर्वी या पदाचा पदभार स्वीकारला आणि आमच्या संपूर्ण बॉडीला आज दोन वर्ष पूर्ण झालेले आहेत. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की या दोन वर्षांमध्ये दोन मोठ्या निवडणुका झाल्या एक आमदारकी आणि दुसरी खासदारकी दोन्ही वेळेच्या आचारसहिता खूप मोठ्या होत्या, त्या नंतरच्या काळात कोरोना महामारी सुरू झाली त्या मध्ये पूर्ण एक वर्ष गेले आहे, दोन वर्षांमध्ये आम्हाला नैसर्गिक संकट दोन वेळा महापूर येऊन गेलेला आहे या सगळ्या संकटांचा काळात माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी त्यांच्या वॉर्ड मध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीने काम केलेले आहे. आज हे शिबिर आपण या कालावधीत घेत आहोत, आपली आपण काळजी घेतली पाहिजे, विशेषतः महिला घरच्याची काळजी घेत असतात मात्र स्वतःची काळजी घेत नाहीत या शिबिरात आपली वैद्यकीय तपासणी करून घ्या असे सांगितले.

शिबिरात मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व नगरपरिषद कार्यालयाच्या इमारतीची पाहणी करून समाधान व्यक्त केले. नगरसेवक, नगरसेविका,नगरपरीषदेचे कर्मचारी, अधिकारी,पत्रकार आणि काही सामाजिक संस्था यांचा यावेळी कोव्हीड काळात केलेल्या कामाचा गौरव म्हणून सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
मुंब्रा कौसा येथील काळसेकर हॉस्पिटलच्या डॉ. यासिम सय्यद, डॉ. सद्दाम हुसेन, परिचारिका उषा केदारी, निलम यशवंतराव, मेहरिन शेख अन्सारी शिल्फा, व्यवस्थापक विक्रम कोळेकर यांनी इसीजी, ब्लड शुगर, रक्तदाब तपासणी आदी वैद्यकीय तपासणी केली.
शिबिरात वैद्यकीय तपासणी केलेल्या नागरिकांना काही दोष आढळल्यास पुढील तपासणी कोळसेकर हॉस्पिटल येथे करण्यात येणार आहे. त्यांना शासनाच्या योजनेतून पुढील उपचार करण्यात येतील असे डॉ. यासिम सय्यद यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रविंद्र लाड यांनी केले.








Be First to Comment