अपंगाना दया अथवा सहानुभूती नको,त्यांना त्यांच्या हक्कांबाबत जागृत करणे गरजेचे : रोहन देशमुख
सिटी बेल लाइव्ह । धाटाव । शशिकांत मोरे ।
गेली ३६ वर्षांपासून अपंगांसाठी कार्यरत असणा-या हेल्पर्स ऑफ दि हँण्डिकॅप्ड-कोल्हापुर या संस्थेच्या रायगड युनिटच्या वतीने आयोजित रोह्यातील प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबीराला लाभार्थ्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.या शिबिरात नाव नोंदणी करण्यात आल्याने याचा असंख्य अपंग व्यक्तींना फायदा होणार आहे.
संस्थेच्या कोल्हापूर युनिटचे तानाजी देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली तर रायगड युनिट हेड रोशन अमोल देशमुख यांच्या अध्यक्षयतेखाली रोह्यात ज्येष्ठ नागरिक सभागृहात पार पडलेल्या या शिबिरात अपंग प्रमाणपत्र नूतनीकरण,युडीआय कार्ड,रेल्वे पास,पेन्शन धारकांसाठी मार्गदर्शन,शस्त्रक्रिया,अपंगांच्या हक्कासाठी कार्य,अपंगत्वानुसार साहित्य उपलब्ध करून देणे,व्यवसाय व नोकरी यासाठी प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यात आले.

अपंगांच्या सर्वांगीण पुनर्वसनासाठी कार्यरत असलेल्या घरोंदाच्या माध्यमातून अपंगार्थ विद्यार्थी वसतिगृह तथा पुनर्वसन केंद्र,समर्थ विद्या मंदिरच्या माध्यमातून सदृढ आणि अपंगांसाठी एकत्रित शिक्षण,स्वप्ननगरीच्या माध्यमातून शेती प्रकल्प,लाजवाबच्या माध्यमातून काजू प्रक्रिया केंद्र तर अपंगांच्या व्यावसायिक प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून या सर्व संस्था उल्लेखनीय काम करीत आहेत.

अपंगाच्या समस्या,गरजा या सर्वसाधारण विद्यार्थ्यांपेक्षा वेगळ्या आहेत.त्यांना वेळ द्यावा लागतो. श्ावणयंत्रे,कॅलीपर्स,क्रचेस यासारख्या वस्तू पुरवून त्यांच्या समस्या संपत नाही.विशेष मुलांच्या विशेष शाळांनी विशेष पद्धतीने त्यांचा बौद्धिक विकास घडवून आणला पाहिजे.आज कम्प्युटर, फिल्मफोटोग्राफी,मास मीडिया अशी अनेक क्षेत्रे अपंगांसाठी खुली करता येण्यासारखी आहेत.कार्यानुभावर आधारित अभ्यासक्रम अनेकांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यास मदत करतील.उद्याच्या जागतिक अपंगदिनी याचा विचार गांभीर्याने व्हायला हवा.अपंगांना कोणाकडूनच दया अथवा सहानुभुती नको तर त्यांना त्यांच्या हक्कांबद्दल जागृत करणे या उद्देशाने हे शिबिर भरविले असल्याचे रायगडच्या युनिट हेड रोशन देशमुख यांनी सांगितले.

केवळ योजनांची घोषणा करून अपंगांच्या समस्या सुटणार नाहीत हे लक्षात घ्यावे लागेल.अपंगांबाबत सहानुभूतीचा दृष्टीकोन ठेवला नाही, तरी चालेल.परंतु,त्यांना त्यांचा हक्क द्यावा.त्यांच्यासाठी असलेल्या प्रत्येक योजनेचा फायदा मिळावा.जेणेकरून तेदेखील स्वतःच्या पायावर उभे राहू शकतील.समाजानेदेखील अपंगांना वेगळा घटक न समजता योग्य मानसन्मान द्यावा.तसेच नोकरीच्या ठिकाणी सर्व सोयी उपलब्ध करून द्याव्यात असे संस्थेच्या कोल्हापूर युनिटचे तानाजी देसाई यांनी याप्रसंगी सांगितले.

या शिबिराला रोहा नगर पालिकेचे उपनगराध्यक्ष महेश कोलाडकर,नगरसेवक समीर सकपाळ,सकल मराठा समाज अध्यक्ष प्रदीप देशमुख,पत्रकार अल्ताफ चोरडेकर,महादेव सरसंबे,प्रशांत देशमुख,भाई बामुगडे,समाधान शिंदे यांसह इतर मान्यवरांनी सदिच्छा पर भेट देऊन शुभेच्छा दिल्या.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी काशिनाथ देशमुख,अमोल देशमुख यांसह संस्थेच्या सर्व सहकारी वर्गाने विशेष मेहनत घेतली.








Be First to Comment