सुख
काहूर मनातले,शब्दातुनी झिरपले
वेड किती सुखाचे,बळेच पांघरले
अवचित परिमळ रातराणीचा
वेड लावून गेला
कुठे मालकौंस गुंजला
क्षण सुखाचा मी कवटाळला
रम्य वाट रानातली
सखी संगे पाऊले टाकली
गूज अंतरीचे कथिताना
सुखाचीच देवघेव झाली
एकलीच विसावले नदीकिनारी
नितळ प्रवाही झुळझुळणारी
पाखरे किलबिलली गोड हळूवार
झुळूक सुखाची क्षणैक अलवार
पश्चिमेस संध्यारंग उधळले
मऊशार वाळूत पाय रोविले
हेलकावे लाटांचे मनास जोजविले
क्षणभर सुखास उधाण आले
क्षण कधी हसताना
सुख साजरे झाले
मृगजळ असुनही भासमय
आनंदक्षणांचे झेले सुखमय
डॉ. अंजली टकले, नवीन पनवेल







Be First to Comment