पोतराज
अंधश्रद्धेची डोक्यावर टोपली
टोपली सारी अंधारानं भरली
पाठीवर लेकरं शांत झोपली भटक्या-विमुक्तांची परवड झाली
मरीआई भोवती धरुन फेर
पोतराज खेळे आसुडांचा खेळ
मळवट भाळी हळदी-कुंकवाचा
स्त्री वेशातील जटाधारी देवीचा
चिंध्यांच्या घागऱ्यावर घुंगुरमाळा
पायातील खूळखूळ्यांचा नाद आगळा
गळ्यात मण्यांच्या माळा घालतो
आत्मक्लेशाचे शरीरी वार करतो
घुमायला लागता देवी अंगात
प्रश्नांना उत्तर मिळते क्षणात
कडकलक्ष्मी भिक्षेकरणीचा खेळ
सांधतोय त्याच्या जीवनाचा मेळ
ना घर ना दार ना शिक्षण
सरकार मात्र देतंय आरक्षण
शिकून त्यांनी व्हावे सक्षम
राजकारण मुरतंय विलक्षण
गावकुसाबाहेरचं जीणं
उपेक्षितांचं आतून गहिवरणं
ना समाजात राहिला कोणी वाली
जो लोककलेची वाजवेल टाळी
प्रबोधन होवो लोककलाकारांचं
त्यांच्या ज्ञान आरोग्य निवाऱ्याचं
मायेनं प्रवाहात सामावण्याचं
उणं दुणं हद्दपार करण्याचं
अजून लांब आहे तो सुदिन
पोतराजाला स्व-पीडन ना नवीन
फटक्यांच्या आवर्तनातही नर्तन
अठराविश्व दारिद्र्य हेचि प्राक्तन
.
स्वाती लेले, नवीन पनवेल







Be First to Comment