सिटी बेल लाइव्ह । कर्जत । गणेश मते।
उकरूळ गावातील हनुमंताच्या मंदिराचा नुकतेच जीर्णोद्धार करण्यात आला आहे. यावेळी, पुरातन मूर्तीला आकारबद्ध करून तिची पुनर्प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. शनिवार आणि रविवारी संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला ग्रामस्थांचा उदंड प्रतिसाद लाभला. यावेळी, हभप मारुती महाराज राणे उपस्थित होते.
स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतिकारांचे वास्तव्य लाभलेले उकरूळ येथील हनुमंताचे मंदिर जीर्णावस्थेत होते. ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन ग्रामस्थांच्यावतीने या मंदिराचा नुकतेच जीर्णोद्धार करण्यात आला आहे. यावेळी, शनिवारी सकाळी गणेश पूजनासह मंत्रघोष आणि उकरूळ वारकरी संप्रदायाच्यावतीने सदर मूर्तीची गावात दिंडी काढण्यात आली. त्यानंतर जलाभिषेक करण्यात आला.
तर, सायंकाळी हरिपाठ आणि रात्री भजनाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच, रविवारी पहाटे काकड आरती, सकाळी होमहवन झाल्यानंतर मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसह कलशारोहन, ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी, हभप श्रीरामतात्या देशमुख (इंजिवली) यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या सोहळ्याला उपस्थिती दर्शवत दर्शन घेतले.
Be First to Comment