पनवेल इंडस्ट्रियल इस्टेट च्या “उद्योग श्री” गणेशाची प्राणप्रतिष्ठा संपन्न
सिटी बेल लाइव्ह । पनवेल ।
पनवेल इंडस्ट्रियल इस्टेट आवारात असणाऱ्या गणपती मंदिर स्थापनेला 51 वर्षे पूर्ण झाली आहेत. "उद्योग श्री" या नावाने येथील गणपतीबाप्पा ओळखले जातात. रविवार दिनांक 10 जानेवारी रोजी या मंदिरात नव्या रूपातील गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. दोन दिवसांच्या धार्मिक विधी नंतर महाप्रसादाने या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सांगता झाली.पाषाणात घडवलेल्या सुबक गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर मंदिर सगळ्यांना दर्शनासाठी खुले झाले आहे.
मंदिर विश्वस्त कमिटीचे तथा पनवेल इंडस्ट्रियल इस्टेट चे चेअरमन विजय लोखंडे यांनी या सोहळ्या बाबत आमच्या प्रतिनिधीशी सविस्तर चर्चा केली.ते म्हणाले की, 1970 साली याठिकाणी उद्योजकांना भूखंड प्रदान केल्यानंतर हा भूखंड स्मशानालगत असल्याकारणामुळे अनेक उद्योजक येथे व्यवसाय थाटण्यास राजी नव्हते. त्यावेळी चेअरमन असणारे माझे वडील रामचंद्र लोखंडे यांनी उद्योजकांना प्रेरणा देण्यासाठी आणि धार्मिक पाठबळ देण्याच्या उद्देशाने येथे एका खांबावर गणेश मंदिराची निर्मिती केली. आज या मंदिर निर्मितीला 51 वर्षे पूर्ण झाली आहेत. आजमितीला या इंडस्ट्रियल इस्टेट मध्ये 90 कारखाने कार्यरत आहेत. येथील 30% कारखाने पनवेलकरांच्या मालकीचे आहेत. माझ्या सकट या कारखानदारांची तिसरी पिढी आज येथे काम करत आहे.
उद्योगश्री नावाने प्रचलित असणाऱ्या या गणपतीच्या आगमनाने येथील उद्योग वाढीस लागले. अर्थातच त्यामुळे पणवेलकरांना हक्काचे रोजगार उपलब्ध झाले. लोखंडे पुढे म्हणाले की जसजशी इंडस्ट्रियल इस्टेट विस्तारत होती तसतसे मंदिराचे बांधकाम देखील वृद्धिंगत होत होते. गाभारा,सभामंडप हे सारे कालांतराने बांधले गेले. परंतु 51 वर्षात मूळ संगमरवरात घडवलेल्या मूर्तीची क्षती झाली असल्याकारणाने, नव्या रूपातील श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा ही काळाची गरज बनली होती. नव्या रूपातील मूर्ती हि पाषाणात घडविलेली असून त्यासाठी आम्ही स्वर्गीय ज्योतिर्भास्कर साळगावकर यांचा सल्ला देखील घेतला होता.
पनवेलचे सुप्रसिद्ध करंदीकर गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर जीर्णोद्धार व नव्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. धर्मशास्त्रानुसार जुन्या गणेशमूर्तीचे विधिवत पूजा पाठ करून मध्य समुद्रात त्याचे विसर्जन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या गणपतीच्या अस्तित्वाने येथील उद्योग, उद्योजक, कामगार या साऱ्यांनाच प्रेरणा मिळत असते. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे मुसलमान, ख्रिश्चन, जैन, शीख अशा नानाविध धर्मातील आमचे सदस्य "उद्योग श्री" गणेश सेवेसाठी आपापले योगदान देत असतात.
Be First to Comment