अवकाशात २१ डिसेंबरला तब्बल ४०० वर्षानंतर होणार गुरु-शनी ग्रहांची महायुती
सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम ।
येत्या २१ डिसेंबरच्या संध्याकाळी अवकाशात एक दुर्मिळ क्षण पाहता येणार आहे. या दिवशी गुरु आणि शनी ग्रह मकर राशीमध्ये एकमेकांच्या अगदी जवळ दिसणार आहेत.पृथ्वीवरून पाहताना काही वेळेला दोन खगोलीय घटक ( चंद्र-ग्रह, तारे) एकमेकांच्या जवळ आल्यासारखे आपल्याला दिसतात याला “युती” असे म्हटले जाते. प्रत्यक्षात हे घटक एकमेकांच्या जवळ असतीलच असे नाही.
आतापर्यतच्या युती पेक्षा हि युती अदभुत असेल कारण या आधी सन १६२३ मध्ये हे दोन्ही ग्रह इतके जवळ आले होते. म्हणजे सुमारे ४०० वर्षानंतर असे दुर्मिळ दृश्य पहायला मिळणार आहे, असे ग्लोबल मिशन अॅस्ट्रोनोमी अँड रिसर्च सेंटर चे अध्यक्ष व खगोलशास्त्रज्ञ विशाल कुंभारे यांनी खगोलीयन माहिती दिली .
सदर या बाबतीत अधिक माहिती देताना कुंभारे यांनी सांगितले की, सर्व ग्रह सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत असतात. गुरु ग्रह सूर्याभोवती ११.८६ वर्षात तर शनी २९.५ वर्षात सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करतो. दोघांच्या या परिभ्रमण काळात दर १९.६ वर्षांनी गुरु- शनी ग्रहांची युती होते म्हणजेच दोघेही एकमेकांच्या जवळ आल्यासारखे दिसतात, पण प्रत्यक्षात ते पृथ्वीवरून दिसतात तेवढे जवळ नसतात. १९८० साली गुरु-शनी युती पाहिली होती, अलीकडेच म्हणजे २००० साली झालेली युती हे दोन्ही ग्रह सूर्याच्या जवळ म्हणजेच ३ अंश अंतरावर असल्याने दिसू शकली नाही.
दर २० वर्षांनी गुरु -शनी ग्रहांची युती होत असली तरी २१ डिसेंबर २०२० रोजी ची महायुती मात्र दुर्मिळ क्षण आहे. यावेळी शनी आणि गुरु हे एकमेकांच्या अगदी जवळ येणार आहेत. यावेळी त्यांच्यातील अंतर फक्त ०.१ अंश असेल, असे कुंभारे यांनी सांगितले.
सध्या हे दोन्ही ग्रह सूर्यास्तानंतर काही वेळ पश्चिम अवकाशात दिसत आहेत. यांचे रोज निरीक्षण केल्यास गुरु हळूहळू शनीच्या जवळ येताना आपल्याला दिसेल. २१ डिसेंबरच्या संध्याकाळी सूर्यास्तानंतर तेजस्वी गुरु व शनीची जोडी दक्षिण -पश्चिम अवकाशात दिसायला लागेल. तसेच संपूर्ण अंधार पडल्यावर ही महायुती अधिक चांगली दिसेल. साधारण ८ च्या सुमारास हे ग्रह मावळेपर्यंत आपल्याला यांची महायुती पाहता येईल.
पुण्यातून हि युती आपल्याला दक्षिण-पश्चिम क्षितिजावर २३ अंशावरती सूर्य मावळतीला जाताना ६ नंतर दिसेल. हि युती गुरु-शनी मावळेपर्यंत म्हणजेच रात्री ८.१७ वाजेपर्यंत पाहू शकतो. यावेळी गुरूची तेजस्विता -२.० व शनीची तेजस्विता ०.५ असेल.
या नंतरची अशी युती २०४०, २०६० व त्यानंतर २०८० ला दिसेल .पण गुरु-शनी ग्रहांमधील अंतर २१ डिसेंबर २०२० ला तुलनेने कमी असेल. कोणत्याही साधनांशीवाय फक्त डोळ्यांनी देखील हे दृश्य दिसणार आहे. दुर्बीण किंवा द्विनेत्रीने अधिक चांगले निरीक्षण करता येऊ शकेल, तेव्हा २१ डिसेंबरला अवकाशातील ही दुर्मिळ घटना पहायला विसरू नका, असे आवाहन विशाल कुंभारे यांनी केले.








Be First to Comment