Press "Enter" to skip to content

पाचोळा

पाचोळा

एका पाकळीचा जीव
बाई जडला देठाशी
तिची उमलती खूण
राही हिरव्या ओठाशी…

हिरव्याश्या ओठांवर
तिनं लिहिलेलं गाणं
पान, वेल, फुल कळी
सारे म्हणती सुरानं…

सूर भिनला पानात
सारं झाडं सुखावलं
प्रेमानं या पाकळीच्या
देठ किती भारावलं…

धडधडे भारावून
त्याचं पाचूचं काळीज
कासावीस दिस सारा
राती उडलेली निज…

एका निजत्या वेळेला
मग फुलली पाकळी
देखण्याश्या फूलगाली
रुतु लागली गं खळी…

खळी लाजली इतकी
फूल तरारुन आले
पाकळीच्या पायातले
त्राण पुरते गळाले…

गळू लागली पाकळी
फूल सोडून मुक्याने
देठ गिळतो हुंदका
एका चुकल्या ठोक्याने…

चुकलेच बाई तिचे
नको तिथं ती गुंतली
तिथं देठाच्याही मनी
सल कोरडी राहिली…

राहिले न काही मागे
सारे पाचोळ्यात जमा
गेला सुकून गं देठ
गेला हिरवा मुलामा…

पूजा भडांगे, पुणे

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.