स्पंदने
कशी सावरू आवरू मी मनाला तुझी सावलीही दिसेना जिथे
कधी पाहता दर्पणी मात्र मी बिंब माझे दिसे ना मला का तिथे
तुला स्पर्शता मी अशी वागते प्राशली मी जणू धुंद होण्या सुरा
कटाक्षात मी चोरट्या लाजते पापण्यांचा पहारा नसावा जरा
मनाच्या तळाचा कुणा थांग लागे कुठे शोध घ्यावा सुखाचा कसा
मऊसूत धागे उन्हाचे विणावे हळू शाल घे सावलीचा वसा
फितूरी करावी कधी चांदण्यांनी नभाचे निळ्या दान द्यावे मला
धरा अंबराला मिळावी कशी रोजचा घालते मी उखाणा तुला
कधी माळता कुंतली मोगरा गंध का खेळतो डाव कोरा नवा
तुझ्या बाहुपाशात येता घुमू लागतो का मनाचा खुळा पारवा
टिपावेस रात्री हळूवार सौंदर्य डोळे तुझे रे खरे पारखी
पहाटेस कोमेजली रातराणी बिचारी कहाणीस या पारखी
अनोख्या प्रदेशीच वास्तव्य माझे अनोखीच माझी सदा बंधने
तरी भासती जन्मजन्मांतरीची जुनी ओळखीची तुझी स्पंदने
निलिमा देशपांडे, नवीन पनवेल







Be First to Comment