त्रिपुरी पौर्णिमा
कार्तिक पौर्णिमा नाम त्रिपुरारी पौर्णिमा।
सर्वत्र दीपोत्सवः कुर्वन्ति।
षड्कृत्तिकासह चंद्रस्य पूजनं।
ये कुर्वन्ति ते शिवकृपा प्राप्नुवन्ति।
स्नान दान व्रत तपादि विशेषं फलं लभन्ते।
तथा दीपदानस्य अधिकं महत्वम् अस्ति
खरं तर पौर्णिमा आणि अमावास्या यांचा संबंध मानवी मनाशी, त्याच्या संवेदनांशी आहे. आपल्या हिन्दू धर्मात प्रतिवर्षी बारा पौर्णिमा व अमावास्या येतात. आपण पंचांग किंवा दिनदर्शिका नीट पाहिल्यास लक्षात येईल की प्रत्येक पौर्णिमा-अमावास्येला कोणता ना कोणता सण, उत्सव हा असतोच! काही पौर्णिमा इतर धर्मातही उत्सवस्वरूपात साजऱ्या होतात.
कार्तिक पौर्णिमेला “त्रिपुरारी पौर्णिमा” असे म्हणतात. या पौर्णिमेच्या दिवशी जेवढे उत्सव साजरे होतात तेवढे इतर कोणत्या दिवशी क्वचितच असतील! या दिवसाचे महत्व सांगणाऱ्या अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत. काही कथा परिचित आहेत तर काही अपरिचितही असतील! विविधांगानी नटलेल्या या पौर्णिमेचे काही पैलू आपण अनुभवूया!
त्रिपुरासूर हा तारकासूर या राक्षसाचा मुलगा! त्याने संपूर्ण विश्वावर स्वतःची सत्ता स्थापन करून तीन पुरांचे निर्माण केले. भगवान शंकरानी एकाच बाणात त्याच्यासह त्याच्या तिन्ही पुरांचा नाश केला आणि ते “त्रिपुरारी” या नावाने प्रसिद्ध झाले. त्रिपुरासुराच्या वधामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले म्हणून या दिवशी अनेक दिवे लावून देवदिवाळी साजरी केली जाते. या दिवशी शंकरांच्या पूजेचे विशेष महत्व आहे.
कार्तिक पैर्णिमेच्या दिवशी चंद्राचे रूप मोहक असते त्यात ती कृत्तिका नक्षत्रात आल्यास तिचे महत्व शतपटीने वाढते. या मासात कार्तिकस्नान केले जाते म्हणजे सूर्योदयापूर्वी उठून नित्यकर्म आटेपून स्नान करून देवांची काकडआरती केली जाते. त्याची समाप्तीही कार्तिक पौर्णिमेला होते.
सृष्टी निर्माण करण्यासाठी भगवान विष्णूने आपला प्रथम अवतार म्हणजेच “मत्य्यावतार” याच दिवशी धारण केला. भगवान शंकराचा मोठा मुलगा “कार्तिकेय” याचा जन्मही याच दिवशीच झाला. तुलसीविवाहाची समाप्तिही याच दिवशी होते.
राजस्थान येथील “पुष्कर” गावात ब्रह्माचे मंदिर आहे. आजच्या दिवशी तेथे विशेष पूजा केली जाते. तेथील पुष्कर तलावात ब्रह्मा, विष्णू, महेश यांना मंगल स्नान घातले जाते. जगप्रसिद्ध पुष्करमेळा याच दिवशी आयोजित केला जातो.
चातुर्मासात केल्या जाणाऱ्या व्रतवैकल्यांचे पारणे याच दिवशी “अन्नकूट” करून केले जाते. यानिमित्ताने सहभोजनाचा आस्वाद घेतला जातो. महालक्ष्मी आणि अन्नपूर्णा मंदिरातील अन्नकूटाला विशेष महत्व आहे.
भारताच्या वेगवेगळ्या भागात हा दिवस विविध नावांनी साजरा होतो. ओडिसा येथे “बोईता” या नावाने हा सण साजरा करतात. केळी व माडाच्या खोडापासून छोटी नाव तयार करून त्यात दिवे लावून नदीत सोडले जातात. कार्तिकमासात दीपदानाचे महत्व अधिक आहे. आपल्या पूर्वजांच्या नावाने गंगेसारख्या पवित्र नद्यांमधे दीपदान करण्यात येते. तामिळनाडूमधे “कार्तिकदीपम्” या नावाने दहा दिवसांचा उत्सव साजरा केला जातो. इंडोनेशिया, जावा, सुमात्रा, श्रीलंका, बाली आदी देशांमधेही आजच्या दिवशी विविध प्रकारचे उत्सव संपन्न होतात.
जैन धर्मातही चातुर्मास समाप्ती याच दिवशी होते. शंत्रुंजय पर्वतावरील आदिनाथ मंदिरात कार्तिक पौर्णिमेला मोठी यात्रा भरते. तेथे भाविक मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी जातात. शिखधर्माचे धर्मगुरू श्री गुरूनानकसाहेब यांचा जन्मही याच दिवशी आहे. जगभरातील शिखबांधव गुरू नानकजयंती “गुरूपूरव” किंवा “प्रकाशपर्व” म्हणून साजरी करतात.
असा हा विविधांगांनी रंगलेला दिवस दिव्याच्या प्रकाशाने न्हाऊन निघतो. सर्वत्र पसरणारे चैतन्य दिव्याच्या प्रकाशात जनमानसाला उजळून टाकते. मनात आनंदाचे व उत्साहाचे भरते आणते. अशा या तेजस्वी त्रिपुरारी पौर्णिमेच्या सर्व वाचकांना शुभेच्छा!
वैद्य हर्षदा देशपांडे,
इंदौर मध्यप्रदेश








Be First to Comment