
पनवेल (प्रतिनिधी) दीपक फर्टिलायझर्स अँड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेडच्या सहाय्याने कार्यरत सामाजिक विकास संस्था ईशान्य फाउंडेशनने महाराष्ट्रातील पनवेल येथील भोकरपाडा येथे प्रगत कौशल्य विकासासाठी ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ उभारण्यासाठी नामटेक (NAMTECH) सोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे.
नामटेक ही आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांनी स्थापन केलेल्या सेक्शन ८ कंपनीचा एकभाग असून, सध्या ती गुजरातमधील गांधीनगर येथे कौशल्य विद्यापीठ उभारण्याचे काम करत आहे. ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ स्थापन करण्याचा हा प्रकल्प दीपक फर्टिलायझर्सच्या कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमांचा भाग असून, रोजगारक्षमता वाढवणे आणि उद्योगसिद्ध मनुष्यबळ तयार करण्यासाठी भविष्याभिमुख कौशल्य विकास परिसंस्था उभारणे हा यामागील उद्देश आहे.
हा उपक्रम दीपक फर्टिलायझर्स चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर एस. सी. मेहता, तसेच ईशान्य फाउंडेशन मॅनेजिंग ट्रस्टी पारुल मेहता यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व व मार्गदर्शनातून साकार झाला आहे. शिक्षण आणि कौशल्य विकासाद्वारे सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यामध्ये त्यांच्या नेतृत्वाची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे.या तीन वर्षांच्या सहकार्याअंतर्गत, नामटेक (NAMTECH) ईशान्य फाउंडेशनला “सेंटर ऑफ एक्सलन्स” स्थापन व कार्यान्वित करण्यासाठी तांत्रिक सल्ला आणि अंमलबजावणीसाठी मदत करणार आहे.
या उपक्रमाद्वारे बेरोजगार युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याबरोबरच उद्योगात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी कौशल्यवृद्धी आणि पुनःकौशल्यविकासकार्यक्रमदेखील राबविण्यात येणार आहेत.पनवेलमधील भोकरपाडा येथे जुन्या मुंबई–पुणे महामार्गालगत दोन एकर जागेवर हे उत्कृष्टता केंद्र विकसित करण्यात येणार आहे. उत्पादन, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान क्षेत्रांतील बदलत्या गरजा लक्षात घेऊन कौशल्य दरी कमी करणे, उत्पादकता वाढविणे आणि रोजगार क्षमतेत सुधारणा घडविणे हा या संस्थेचा उद्देश असेल.
या उत्कृष्टता केंद्रामध्ये उत्पादन, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान क्षेत्रांतील प्राधान्यक्षेत्रे व रोजगार भूमिका निश्चित करण्यात येतील. तसेच विद्यार्थ्यांची मागणी आणि उद्योगाच्या गरजेनुसार प्रवेश क्षमतेचे नियोजन केले जाईल. आधुनिक वर्गखोल्या, प्रयोगशाळा, कार्यशाळा, नवोपक्रम केंद्रे, प्रशासकीय सुविधा, वसतिगृह, कॅफेटेरिया आणि आवश्यक पायाभूत सुविधा येथे उपलब्ध असतील. हा प्रकल्प अंदाजे ३५ महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करण्याचे नियोजन असून, बांधकाम व टप्प्याटप्प्याने विकास नामटेकच्या तांत्रिक शिफारसी आणि जागा नियोजनानुसार करण्यात येईल. उद्योग भागीदारांच्या सहकार्याने अत्याधुनिक प्रयोगशाळा आणि नवोपक्रम केंद्रे विकसित केली जातील. या सामंजस्य करारावर ईशान्य फाउंडेशन तर्फे दीपक फर्टिलायझर्सचे प्रेसिडेंट कॉर्पोरेट गव्हर्नन्स नरेश पिनिसेट्टी आणि संचालक एम. पी. शिंदे यांनी तर नामटेक तर्फे महासंचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इब्राहिम हफीजूर रहमान यांनी स्वाक्षरी केली.


Be First to Comment